प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना संशयित रूग्णांवर प्लाझ्मा थेरपी वापरण्यासाठी इंडियन कौन्सील ऑफ मेडीकल रिसर्च (आयसीएमआर) संस्थेकडे प्रस्ताव दिला आहे. त्यांची परवानगी मिळाल्यास लवकरच राज्यभर प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाईल, सद्यस्थितीत प्लाझ्मा ट्रान्समिशनला परवानगी असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
कोल्हापुरातील पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा घेण्यात आला आहे. त्याच्या वापर हायरिस्क रूग्णांवर केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठवला होता. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी प्लाझ्मा थेरपी वापरण्यास परवानगी दिल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा त्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पण इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेची त्यासाठी मान्यता हवी आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली असली तरी आयसीएमआर संस्थेच्या परवानगीची प्रतिक्षा आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांकडून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. परवानगी मिळताच कोल्हापुरातील सीपीआरमधील हाररिस्क रूग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाईल, अशी माहिती राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.