प्रेंच ग्रँडस्लॅम : मेदवेदेव्ह, मोनफिल्स स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था / पॅरिस
स्पेनचा राफेल नदाल, अमेरिकेची सेरेना विल्यम्स, गार्बिन मुगुरुझा, झेकची कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांनी पेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे तर डॅनील मेदवेदेव्ह, गेल मोनफिल्स यांचे आव्हान संपुष्टात आले.
20 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या द्वितीय मानांकित नदालने बेलारुसच्या इगोर गेरासिमोव्हचा 6-4, 6-4, 6-2 असा पराभव करून विजयी सुरुवात केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत उतरताना त्याने या मोसमात एकही क्लेकोर्टवरील स्पर्धा जिंकलेली नाही, असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. त्याची दुसरी लढत मॅकेन्झी मॅकडोनाल्डशी होणार आहे. आठव्या मानांकित फ्रान्सच्या गेल मोनफिल्सला अलेक्झांडर बुबलिकने 6-4, 7-5, 3-6, 6-3 असे हरवित स्पर्धेबाहेर घालविले. 1983 नंतर फ्रान्सच्या एकाही खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. अन्य एका सामन्यात चौथ्या मानांकित मेदवेदेव्हला पराभूत व्हावे लागले. त्याला हंगेरच्या मार्टन फुक्सोविक्सने 6-4, 7-6 (7-3), 2-6, 6-1 असे नमविले. सलग चार वर्षे मेदवेदेव्हला या स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे.
लॉरेन्झोचा विक्रमी विजय
आणखी एका विक्रमी सामन्यात इटलीच्या लॉरेन्झो गुस्टिनोने फ्रान्सच्या कोनेन्टिन मुटलेटचा 0-6, 7-6 (9-7), 7-6 (7-3), 2-6, 18-18 असा पराभव केला. तब्बल सहा तास पाच मिनिटे रंगलेला हा सामना या स्पर्धेच्या इतिहासातील दुसऱया क्रमांकाचा दीर्घवेळ चाललेला सामना आहे. यातील शेवटचा सेट तब्बल 180 मिनिटे चालला होता. रविवारी उशिराने सुरू झालेला हा सामना याआधीचा विक्रम मोडण्यात 28 मिनिटांनी कमी पडला. 2004 मध्ये फॅब्रिस सँटोरो व अरनॉड क्लेमेंत यांच्यातील पहिल्या फेरीची मॅरेथॉन झुंज 6 तास 33 मिनिटे रंगली होती. सँटोरोने तो सामना 6-4, 6-3, 6-7 (5-7), 3-6, 16-14 अशा सेट्सनी जिंकला होता.
महिलांमध्ये दुसऱया मानांकित प्लिस्कोव्हाने इजिप्तच्या मायर शेरीफचा 6-7, (7-9), 6-2, 6-2, एलेना ओस्टापेन्कोने मॅडिसन ब्रेन्गलचा 6-2, 6-1, सेरेना विल्यम्सने क्रिस्टी ऍनचा 7-6 (7-2), 6-0, मुगुरुझाने तमारा झिडन्सेकचा 7-5, 4-6, 8-6, इगोर स्वायतेकने मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाचा 6-1, 6-2 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.