रेल्वेला तोटा – माहिती अधिकारात आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्थानकांवर कोरोनाच्या कारणास्तव गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी रेल्वेने लागू केलेल्या नियमावलींमध्ये प्लॅटफॉर्म तिकिट बंद केल्याने रेल्वेला नुकसान सहन करावे लागले आहे. रेल्वेला आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद केल्यामुळे जवळपास 150 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती आहे. कंपनीची कमाई आर्थिक वर्षामध्ये फक्त 10 कोटी रुपये राहिल्याची नोंद केली आहे.
आर्थिक वर्ष 2019-20 या कालावधीत रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांमधून 160 कोटी रुपयांची कमाई केली होती. रेल्वेकडून सदरची माहिती ही माहिती अधिकाराच्या अंतर्गत दिली आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री बंद करण्यात आल्यामुळे कमाईमध्ये 94 टक्क्यांचा तोटा झाला आहे. कोरोनाच्या कारणास्तव नागरिकांना रेल्वे स्थानकांकडे जाण्यास निर्बंध लादण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाची किमत वाढवून 50 रुपये केली व नंतर तिकिट विक्री बंद केली होती, अशी माहिती रेल्वेकडून माहिती अधिकाराअंतर्गत दिली गेली आहे. प्लॅटफॉमं तिकीट दरवाढीबाबतचा निर्णय रेल्वेच्या विविध झोनमध्ये राबवण्यात आला होता.