काही दिवसांपूर्वी जितेंद्र जोशी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे – बायस यांच्यासह ‘ज़ून’च्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. अनेक महिन्यांपासून ‘जून इन जून’ च्या चर्चा रंगल्या होत्या. प्रेक्षकांसोबतच आता कलाकारही ‘जून’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे आपल्या या मित्रमंडळींचा आणि प्रेक्षकांचा मान राखत ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी अखेर ‘जून’ चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्याबरोबरीनेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी, ‘अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्लॅनेट मराठी सिनेमा’चा नवीन लोगोही प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यामुळे अनेक दिवसांची ही प्रतीक्षा आता संपली असून चित्रपटप्रेमी लवकरच ‘जून’प्लॅनेट मराठी सिनेमावर पाहू शकणार आहेत. ‘हिलिंग इज ब्युटीफुल’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘जून’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरून साधारण अंदाज आला असेलच. नेहा पेंडसे – बायस आणि सिद्धार्थ मेनन यांचं मैत्री पलीकडचं नातं यात पाहायला मिळणार आहे. नेहा पेंडसे बायस, सिद्धार्थ मेनन, किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन व निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे. तर जितेंद्र जोशी, निखिल महाजन यांचे शब्द लाभलेल्या या चित्रपटातील गाण्यांना शाल्मलीने संगीतबद्ध केले आहे. संवेदनशील कथानक लाभलेल्या ‘जून’ने अनेक राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. ’ जून’ची निर्माती आणि अभिनेत्री नेहा पेंडसे – बायस ‘जून’ विषयी सांगते, जून हा नक्कीच पठडीबाहेरील चित्रपट आहे. हा एक धाडसी विषय असला तरी भावनिक आहे, त्यामुळे दुःखावर हळुवार फुंकर मारत हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच स्पर्श करेल.
Previous Articleखेडमध्ये लाखाचा गांजा जप्त
Next Article तजिंदर पाल सिंग तूरची शानदार कामगिरी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.