१५ हजारांचा दंड वसूल; मनपा आरोग्य विभाग आक्रमक
सांगली/प्रतिनिधी
बंदी असलेल्या सिंगल युज प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर महापालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगरण्यास सुरवात केली आहे. गुरुवारी महापालिकेच्या भरारी पथकाने शहरातील १५ हून अधिक दुकानांची अचानक तपासणी केली. पैकी तीन दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत सिंगल युज प्लॅस्टिक सुद्धा जप्त करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात सिंगल युज प्लॅस्टिक वापरावर बंदी आहे. तरीही अनेक दुकानांमधून सिंगल युज प्लॅस्टिक विक्री होत असल्याची माहिती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार मनपाच्या पथकाने गणपती पेठेतील १५ प्लास्टिक विक्री अस्थापनांची तपासणी केली. यावेळी तीन दुकानांमध्ये बंदी असलेले सिंगल युज प्लॅस्टिक विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे पथकाने 3 आस्थापनाना महापालिकेने 15 हजाराचा दंड करीत त्यांच्याकडील बंदी असणारे सिंगल युज प्लॅस्टिक जप्त केले.