वृत्तसंस्था/ दुबई
मंगळवारी येथे आयपीएलमधील महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. हा सामना जिंकून प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी दिल्लीचा प्रयत्न असेल. सामना सायंकाळी 7.30 पासून सुरू होईल.
दिल्लीचे प्लेऑफमधील स्थान याआधीच निश्चित झाले असते. पण कोलकाता नाईट रायडर्स व किंग्स इलेव्हन पंजाब यांच्याकडून लागोपाठच्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे त्यांना हे उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही.
या पराभवाचे दुःख मागे सारत त्यांना मंगळवारचा सामना जिंकून दोन गुण वसूल करावे लागणार आहेत.
याउलट सनरायजर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान मिळण्याची अगदी अल्पशी आशा आहे. वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हा संघ 11 सामन्यांत 8 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. प्लेऑफसाठी पात्र ठरावयाचे असल्यास त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील आणि इतर सामन्यांचे निकाल त्यांच्या मनासारखे लागतील अशी अपेक्षा करावी लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सकडे स्फोटक फलंदाजांचा आणि बलाढय़ गोलंदाजीचा विभाग असून त्यांना कोण्या एका खेळाडूंवर अवलंबून रहावे लागलेले नाही. त्यांच्या वेगवेगळय़ा खेळाडूंनी आवश्यकता असताना आपला खेळ उंचावून संघाला यश मिळवून दिलेले आहे. मात्र मागील तीन सामन्यात शिखर धवनचा अपवाद वगळता दिल्लीच्या अन्य फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेले नाही. चेन्नईविरुद्धच्या विजयात धवनने शतक झळकावत मोठी जबाबदारी पार पाडली. त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धही त्याने शतक नोंदवले, पण इतरांकडून त्याला पूरक साथ मिळू शकली नाही आणि दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले. केकेआरविरुद्धही दिल्लीचे फलंदाज दडपणाखाली कोलमडले आणि 194 धावांचा पाठलाग करताना 20 षटकांत केवळ 139 धावाच त्यांना जमविता आल्या.
पृथ्वी शॉ खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याच्या जागी रहाणेला सलामीला संधी देण्यात आली. पण तोही शून्यावरच बाद झाला. रिषभ पंत व हेतमेयर यांनाही संघात पुन्हा दाखल झाल्यापासून झगडावे लागले आहे.
दल्लीचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (23 बळी) ऍन्रिज नॉर्त्जे (14) यांनी सर्वोत्तम प्रदर्शन केले असून तुषार देशपांडे व आर. अश्विन यांच्याकडून अलीकडच्या सामन्यात अपेक्षित कामगिरी झालेली नाही. स्पिनर अक्षर पटेलने मात्र धावा रोखताना फलंदाजांना जखडून ठेवण्यात मोलाची कामगिरी केली आहे.
आधीच्या सामन्यात सनरायजर्सला मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. पंजाबचे 127 धावांचे माफक आव्हानही त्यांना गाठता आले नाही. सलामीवीर वॉर्नर व बेअरस्टो बाद झाल्यानंतर या सामन्याचे चित्रच पालटले. शेवटच्या दोन षटकांत त्यांनी तब्बल 5 गडी गमविले आणि एक नामुष्कीजनक पराभव त्यांच्या पदरी पडला. हैदराबाद संघ मुख्यत्वे फलंदाजांवर अवलंबून असून वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे हे त्यांचे प्रमुख फलंदाज आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरने भरीव योगदान दिले. पण त्याची पुनरावृत्ती त्याला पंजाबविरुद्ध करता आली नाही. जेसन होल्डरच्या समावेशानंतर हैदराबाद संघाची गोलंदाजी भक्कम झाली असून मंगळवारी दिल्लीला रोखताना आधीच्या सामन्यासारखेच ते प्रदर्शन करतील, अशी आशा कर्णधार बाळगून आहे. त्यांना दिलासा देणारी आणखी एक बाब म्हणजे याआधी या दोघांत झालेला सामना हैदराबादने जिंकला होता.
@दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, पृथ्वी शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछने, कीमो पॉल्। डेनिस सॅम्स, मोहित शर्मा, ऍन्रिच नॉर्त्जे, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.
@सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, पांडे, गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, अब्दुल समद, विजय शंकर, नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी.संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर, खलील अहमद, संदीप शर्मा, नदीम, कौल, स्टॅन्लेक, टी. नटराजन, थम्पी.