झाय रिचर्डसन, शमी, जॉर्डनमुळे जलद-मध्यमगती गोलंदाजी भक्कम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काही नवे चेहरे व पूर्वीपेक्षा मजबूत संघ उतरवणाऱया पंजाब किंग्सला देखील यंदाच्या आयपीएल मोसमात निर्भेळ यश संपादन करण्याची महत्त्वाकांक्षा असेल. मागील हंगामात ते सहाव्या स्थानी राहिले, प्ले-ऑफची संधी हुकली. त्यामुळे, यंदा प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करणे, हे त्यांचे पहिले लक्ष्य असणार आहे.
पंजाब किंग्स संघाने यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीत संपन्न झालेल्या मागील आयपीएल मोसमात एकवेळ सलग पाच सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला. पण, नंतर ते अचानक प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाद झाले होते. जे सामने जिंकायला हवे होते, ते देखील गमावल्याने त्यांच्यावर ही नामुष्की आली. आता त्या चुका दुरुस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलामीच्या लढतीत एक वादग्रस्त शॉर्ट रनच्या निर्णयामुळे पंजाबची विजयाची संधी हुकली आणि याचा मोठा फटका त्यांना अंतिम टप्प्यात सोसावा लागल्याचे स्पष्ट झाले. यंदा या संघाची आयपीएल मोहीम दि. 12 एप्रिल रोजी होणाऱया राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीने सुरु होईल.
कर्णधार केएल राहुल, मयांक अगरवाल, ख्रिस गेल या दिग्गजांना यष्टीरक्षक-फलंदाज निकोलस पूरनची साथ लाभेल. त्यामुळे, आघाडी फळी उत्तम असणार आहे. मॅक्सवेल संघातून बाहेर झाल्यानंतर अष्टपैलू मोईसेस हेन्रिक्यूज व तामिळनाडूचा फलंदाज शाहरुख खान यांच्यामुळे मध्यफळी भक्कम राहिली आहे. दीपक हुडाने आपण उत्तम फिनिशर होऊ शकतो, हे मागील काही सामन्यात दाखवून दिले आहे. फॅबियन ऍलेनमुळे या संघाकडे आणखी एक विदेशी अष्टपैलू देखील उपलब्ध आहे.
जलद-मध्यमगती गोलंदाजीची धुरा नव्याने करारबद्ध स्पीडस्टार्स झाय रिचर्डसन व रिले मेरेडिथ यांच्यावर असेल. या उभयतांनी बिग बॅश स्पर्धा गाजवली असून येथे मोहम्मद शमी व ख्रिस जॉर्डनच्या साथीला ते उपलब्ध असतील. शमीने मागील 4 महिने क्रिकेट खेळलेले नाही. शिवाय, राष्ट्रीय संघाचे वर्कलोड मॅनेजमेंट पाहता तो येथे सर्व सामने खेळणार का, हे देखील पहावे लागणार आहे.
पंजाब संघाने आजवर एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकलेली नाही. त्याची कसर यंदा भरुन काढण्याचा या संघाचा प्रयत्न असेल. केएल राहुलसारखा कर्णधार व अनिल कुंबळे यांच्यासारखा अव्वल प्रशिक्षक ही या संघाची यासाठी जमेची बाजू असेल.
पंजाब किंग्स संघ ः केएल राहुल (कर्णधार-यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, ख्रिस गेल, मनदीप सिंग, प्रबसिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सर्फराज खान, दीपक हुडा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोईसेस हेन्रिक्यूज, जलज सक्सेना, उत्कर्ष सिंग, फॅबियन ऍलेन, सौरभ कुमार.
मजबूत फलंदाजी हे पंजाब संघाचेही बलस्थान
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत अनेक प्रँचायजींची फलंदाजी लाईनअप भरभक्कम आहे आणि यात पंजाब किंग्स संघाचाही प्राधान्याने समावेश होतो. याच संघातील केएल राहुलने मागील हंगामात ऑरेंज कॅप पटकावली होती. अगदी मयांक अगरवालसह केएल राहुल ही जोडी प्रतिस्पर्ध्यांसाठी धोकादायक ठरु शकते, असे चित्र आहे.
युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल यंदा पहिल्या सामन्यापासूनच विस्फोटक फलंदाजी करेल, अशी या संघाला अपेक्षा आहे. मागील हंगामात त्याने 7 सामन्यात 137.14 च्या स्ट्राईकरेटने 288 धावांची आतषबाजी केली होती. पहिल्या काही सामन्यात मात्र त्याला सक्तीची विश्रांती घ्यावी लागली होती. यंदाही गेलला बॅकअप म्हणून या संघाने डेव्हिड मलानला करारबद्ध केले आहे.
दर्जेदार फिरकी गोलंदाजांची उणीव
अव्वल दर्जाच्या फिरकी गोलंदाजांचा अभाव ही पंजाब किंग्सची सर्वात कमकुवत बाजू आहे. पंजाबने ऑफस्पिनर के. गौतमला संघातून मुक्त केले असून यंदा मुरुगन अश्विन व रवी बिश्नोई यांच्याकडून त्यांना अपेक्षा असतील. प्रथमश्रेणीतील अनुभवी जलज सक्सेनाचा फॉर्म उपयुक्त ठरणार का, याचीही उत्सुकता असेल. यंदा सय्यय मुश्ताक अली चषक स्पर्धेत त्याने 6.26 च्या इकॉनॉमी रेटने 10 बळी घेतले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी फिरकीपटूंची मात्र त्यांना उणीव जाणवू शकते.