धीरज बरगे/कोल्हापूर
कोरोना संकटकाळात गरजू रुग्णांवर दहा, वीस रुपयांत उपचार करण्याचे काम द नेशन फर्स्ट समाजिक संस्थेकडून सुरु आहे. गेल्या दीड वर्षांहून अधिककाळ नागरिकांच्या हाताला रोजगार नसल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या गरजू रुग्णांना माफक दरात उपचार देण्याच्या उद्देशाने संस्थेने आराम कॉर्नर परिसरात ना नफा ना तोटा (धर्मादाय) तत्त्वावर द नेशन फर्स्ट क्लिनिक सुरु केले आहे. एक एमडी आणि दोन बीएचएमएस डॉक्टरांकडून येथे 60 वर्षावरील रुग्णांवर दहा रुपयात तर अन्य रुग्णांवर 20 रुपयात उपचार केले जातात. सकाळी दहा ते दुपारी एक आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत रुग्णांची तापसणी केली जाते.
समाजातील कष्टकरी, गरजवंत नागरिकांना माफक दरात उपचार उपलब्ध करुन देण्यासाठी नेशन फर्स्ट संस्थेकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. सावित्रबाई फुले रुग्णालयातही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन त्याद्वारे रुग्णांवर उपचार होण्यासाठी संस्थेकडुन पाठपुरावा सुरु आहे. यानंतर आता संस्थेने स्वतः क्लिनिक सुरु करुन माफक दरात उपचारास सुरवात केली आहे.
आर्थिक संकटात `द नेशन फर्स्ट’चा आधार
कोरोनाचा फटका सर्वच स्तरातील नागरिकांना बसला आहे. त्यामुळे सर्वांनाच आर्थिक झळ सोसावी लागत आहे. अशा संकटकाळात अनेकांना वैद्यकीय उपचार घेणेही मुश्कील झाले आहे. अशा रुग्णांसाठी नेशन फर्स्ट क्लिनिक आधारवड ठरत आहे. अन्य क्लिनिकच्या तुलनेत निम्म्यांहून कमी दरात येथे उपचार केले जातात.
साथीच्या आजारांवर दहा, वीसमध्ये उपचार
हवामानातील वारंवारच्या बदलामुळे सध्या साथींचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप अशा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. साथींवरील उपचारासाठी एकवेळच्या तपासणीसाठी शंभराची नोट मोडावी लागते. मात्र नेशन क्लिनिकमध्ये यांवर ज्येष्ठ रुग्णांवर 10 रुपयात तर अन्य रुग्णांवर 20 रुपयांत औषधोपचार केला जात आहे.
पाचशेहून अधिक रुग्णांवर उपचार
क्लिनिक सुरु केल्यापासून आत्तापर्यंत पाचशेहून अधिक रुग्णांवर येथे उपचार केले आहेत. अल्पदरात उपचार होत असल्याने विविध भागातील रुग्णांमधून प्रतिसाद मिळत आहे.
डेंग्युवरील उपचार निम्म्या दरात
शहरात सध्या डेंग्यूचे रुग्ण मोठया प्रमाणात आढळत आहेत. त्यावरील उपचारावर रुग्णांचा मोठा खर्च होत आहे. त्यामुळे डेंग्यू रुग्णांवर येथे निम्म्या दरात उपचार केले जात आहेत. जास्तीत जास्त आठ हजारांच्या खर्चात डेंग्यू रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी जात आहे.
सामाजिक बांधिलकी जोपसणारे क्लिनिक
सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने नेशन फर्स्ट क्लिनिक सुरु केले आहे. कोरोना काळात गरजूंना माफक दरात उपचार देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या हातभाराचा संस्थेचा प्रयत्न आहे.
– अवधुत भाट्ये, संस्थापक अध्यक्ष द नेशन फर्स्ट.
नेशन फर्स्ट क्लिनिकमध्ये असे होतात उपचार
उपचार पद्धती दर
प्राथमिक तपासणी 60 वर्षावरील रुग्ण 10 रुपये
अन्य रुग्णांसाठी 20 रुपये
इंजेक्शन 50
सलाईन 200
डेंग्युवरील उपचार 8 हजार