@ सत्तूर / वृत्तसंस्था
तामिळनाडूतील सत्तूर जिह्यात शुक्रवारी फटाक्मयांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत होरपळून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. फटाक्यांसाठी आवश्यक रासायनिक पदार्थांचे मिश्रण करण्याची प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात कारखान्यात नियमांचे पालन केले जात नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
स्फोट होताच अग्निशमन दलाच्या 10 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पण रासायनिक पदार्थांच्या भडक्यामुळे आग विझवण्यात व्यत्यय येत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर परिसरातील लोकांना तातडीने अन्यत्र हलविण्यात आले. स्फोटामुळे सदर इमारतही कोसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 3 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाकडून जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे.
………………..