प्रतिनिधी / कोल्हापूर
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षीत होते. याऊलट भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पडळकरांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जात आहे. त्यामुळे पडळकरांच्या वक्तव्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचाच हात असल्याचा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार बैठकीत दिली.
मुश्रीफ म्हणाले, पडळकर यांची योग्यता नसताना त्यांनी देशाचे नेते शरद पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरला आहे. त्याचा निषेध करतो. फडळकरांच्या वक्तव्याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते फडवीस म्हणतात, ते भावनेच्या भरात बोलले असतील, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की, ते आपल्या अनुभवातून ते बोलले असतील. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखाद्या नेत्याने दुसऱया पक्षातीन एखाद्या नेत्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले असते, तर सुरुवातीस त्याला संबंधितांची माफी मागायला लावली असती आणि त्यांनतर पक्षातून हकालपट्टी केली असती. पण फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांवर कोणतीही कारवाई न करता त्यांच्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थन केले आहे. त्यामुळे आमच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे रक्त सळसळू लागले आहे. आमच्या चिडलेल्या कार्यकर्त्यांनी भविष्यात पडळकर यांना काही केल्यास राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असून त्यास विरोधी पक्षनेते फडणवीस जबाबदार राहतील असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
आमच्या शिव्या ऐकून त्यांना झोप येणार नाही !
पडळकरांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्याला भाजपकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन दिले आहे. त्यांनी शिव्यांच्या स्वरुपात लढाई सुरु केल्यामुळे आणि जाहीर माफी न मागितल्यामुळे आम्हाला देखील शिव्या देण्याचा नैतिक अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे यापुढे आम्ही शिव्या देणार आहोत. त्या ऐकून देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांना झोपसुद्धा येणार नाही असे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
देव पाण्यात घातले तरी नियती साथ देणार नाही
महाविकास आघाडीचे सरकार कोसळावे यासाठी भाजपकडून देव पाण्यात घातले जात आहेत. पण त्यांना नियती साथ देणार नसून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.