प्रधानमंत्री योजनेंतर्गत उत्पादन वाढीवर देणार भर
प्रतिनिधी / पणजी
एक जिल्हा, एक उत्पादन (प्रोडक्ट) या केंद्रीय योजनेंतर्गत गोवा सरकारने उत्तर गोव्यासाठी फणस तर दक्षिण गोव्यासाठी नारळ ही दोन फळे निश्चित केली आहेत. पंतप्रधान मायक्रो फूड प्रोसिसिंग एंटरप्रायझेस अशी ती योजना असून ती अन्न प्रक्रिया मंत्रालयाने आखली आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेतून सदर योजना 30 जून रोजी जाहीर करण्यात आली होती. त्या योजनेच्या अनुषंगाने गोवा सरकारने दोन्ही जिल्हय़ांसाठी राज्य पातळीवर/जिल्हा पातळीवर समित्या स्थापन केल्या होत्या. त्यांना उत्पादन ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही समित्यांनी फणस व नारळ यांना अंतिम मान्यता देऊन त्यांचे पिक वाढवण्यावर भर देण्याची शिफारस राज्य सरकारला केली. ती शिफारस सरकारने मंजूर केली असून दोन्ही जिल्हय़ांसाठी दोन उत्पादनांना अंतिम मान्यता दिली आहे.
राज्य पातळीवरील समितीचे मुख्य सचिव परिमल राय हे अध्यक्ष होते व त्यांनी दोन्ही उत्पादनांना जिल्हा उत्पादने म्हणून मान्य करण्यात आल्याचे सांगितले. दोन्ही उत्पादने वाढवण्यासाठी केंद्र सरकारचे अन्न प्रक्रिया मंत्रालय ध्येय देणार असून ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती राय यांनी दिली.
वैयक्तिक आणि गट अशा दोन पातळय़ांवर दोन्ही पिकांचे उत्पादन वाढवता येणे शक्य आहे. त्यासाठी कमाल रु. 10 लाख पर्यंत अनुदान देण्याची तरतूद योजनेत आहे. स्वयंसेवी गटही या योजनेंतर्गत फणस, नारळ या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढवू शकतात. त्यांनाही अनुदान मिळते, अशी माहिती योजनेत समाविष्ट आहे.