प्रतिनिधी / नागठाणे
कमी दरात खडी व ग्रीट टाकत असल्याच्या गैरसमजुतीतून फत्त्यापुर (ता. सातारा) येथील दिगंबर लक्ष्मण घाडगे या व्यावसायिकावर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्या प्रकरणी बोरगाव पोलिसात आकाश शशिकांत घाडगे (रा. फत्त्यापुर, ता. सातारा) याच्यासह अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर घाडगे व त्याचा मित्र राहुल राजाराम घोलप हे दोघे मिळून खडी व ग्रीट विक्रीचा व्यवसाय करतात. तसेच संशयित आकाश शशिकांत घाडगे हाही खडी व ग्रीट विक्रीचा व्यवसाय करतो. दिगंबर घाडगे व त्याचा मित्र हे कमी दरात खडी व ग्रीट विकत असल्याच्या गैरसमज आकाश घाडगे याला झाला. त्यातूनच शुक्रवारी त्यांच्यात वादावादी व शिवीगाळ झाली होती.
शनिवारी सायंकाळी आकाश घाडगे याने दिगंबर घाडगे याला ‘माफी मागायची आहे’ असे फोनवर सांगून त्याला व राहुल घोलप याला गावातील चौकात बोलावून घेतले. हे दोघे चौकात आल्यावर तेथे एक चारचाकी गाडी उभी असल्याचे व त्यात आकाश घाडगेसह अज्ञात तीन लोक असल्याचे दोघांच्या निदर्शनास आले. यावेळी दोघेही आकाश घाडगे याला भेटायला गेले असता आकाशने गाडीतून तलवार काढून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
तलवार पाहून दोघांनी पळण्यास सुरवात केली असता आकाश व त्याच्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी आकाश घाडगे याने तलवारीने दिगंबर घाडगे याच्या हातावर व डोक्यात वार केले. तर अज्ञात तिघांनी लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दिगंबर घाडगे हा बेशुद्ध झाला. त्याला गावातील ग्रामस्थांनी उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यावर रात्री उशिरा दिगंबर घाडगे याने बोरगाव पोलीस ठाण्यात आकाश घाडगे व अज्ञात तिघांविरोधात फिर्याद दाखल केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.