अटक केलेल्या 5 आरोपींना 9 दिवस पोलीस कोठडी गुंड अन्वर शेख प्राणघातक हल्ल्याचे प्रकरण
प्रतिनिधी / मडगाव
कुप्रसिद्ध गुंड अन्वर शेख उर्फ टायगर याचा आर्लेम येथे गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन फातोर्डा पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या 5 आरोपींना 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. या पाचही आरोपींना कोल्हापूर -शिर्डी मार्गावर असलेल्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती.
सांताक्रूझ येथील इम्रान बेपारी (32), पर्वरी येथील विजय कारबोटकर (3), म्हापसा येथील हर्षवर्धन सावळ (37), सुरावली येथील सुधन डिकॉश्ता आणि पर्वरी येथील महिंदर उर्फ मयूर तानावडे (37) यांना कोल्हापूर- शिर्डी मार्गावर असलेल्या एका हॉटेलातून अटक केली होती. यासाठी कोल्हापूर पोलिसांनी आरोपींना पकडण्यात साहाय्य केले.
या पाचही आरोपींना सोमवारी मडगावच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्यांना 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
गोळी झाडून खून करण्याचा प्रयत्न केला असता जखमी झालेला गुंड अन्वर शेख याच्यावर पूर्ववैमनस्यातून हा प्राणघातक हल्ला करण्यात आला होता याची कबुली आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी फातोर्डा पोलिसांना दिलेली आहे.
16 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी गोळी झाडून अन्वर शेख याचा आर्लेम येथे खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपी व्हॅली डिकॉश्ता याने गोळी झाडली होती. मात्र या आरोपीचा नेम चुकला आणि गोळी गुंड अन्वर शेख याच्या पायाला लागली आणि जखमी अन्वर शेख याला बांबोळी इस्पितळात हलविण्यात आले आहे. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सावर्डे येथील रिकी होर्णेकर याला सर्वप्रथम अटक केली होती.
पूर्ववैमनस्य हेच कारण
या खुनी हल्ल्याचे कारण मुख्य आरोपी व्हॅली डिकॉश्ता सापडल्यावरच कळणार असले तरी पूर्ववैमनस्य हेच कारण असल्याचे अटक केलेल्या इतर आरोपींनी तपास यंत्रणेकडे कबुली दिलेली आहे अशी माहिती फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी सोमवारी सायंकाळी दिली.
सावर्डे येथील रिकी होर्णेकर याला सर्वप्रथम अटक करण्यात आल्यानतंर दुसऱया दिवशी विपूल पट्टारी याला अटक करण्यात आली होती.
हल्ल्यातील वाहन जप्त
गुंड अन्वर शेख याच्यावर प्राणघातक हल्ला करताना आरोपीनी ज्या वाहनाचा वापर केला होता ते वाहन फातोर्डा पोलिसांनी जप्त केलेले आहे.
दरम्यान, जखमी अन्वर शेख याला उपचार घेत असलेल्या इस्पितळातून घरी जाऊ देण्यात आलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या तिळामळ- केपे येथील वेली डिकॉश्ता या फरारी आरोपीच्या शोधार्थ पोलीस आहेत.