मलकापुरात चार तास आगीचे तांडव; किमती फर्निचर खाक; अग्निशमन, पोलीसनी आग आटोक्यात आणण्यासाठी केले प्रयत्न
प्रतिनिधी / कराड
मलकापूर (ता. कराड) येथील आशियाई महामार्गालगत असलेल्या लोटस् फर्निचर शोरूमला गुरूवारी दुपारी भीषण आग लागली. शोरूमच्या पाठीमागील गोडावूनपासून सुरू झालेल्या आगीने रौद्ररूप धारण करत वेगाने शोरूमला विळखा घातला. सुमारे दीड एकरात असलेल्या या शोरूमला लागलेल्या आगीचा थरार तब्बल चार तासाहून अधिक काळ सुरू होता. आगीत गोडावूनसह शोरूममधील महागडे फर्निचर जळून खाक झाले असून कोटय़वधी रूपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांसह अग्निग्नशमन दल, स्थानिक नागरिकांचे पाच तास प्रयत्न सुरू होते.
गोडावूनमधून प्रथम धुराचे लोट
आशियाई मार्गावर मलकापुरच्या हद्दीत सेवारस्त्यालगत मुकेश माने, अनिरुद्ध तवटे व तानाजी जाधव यांच्या मालकीचे लोटस् फर्निचरचे सुमारे दीड एकर जागेत शोरूम हे मोठे आहे. शोरूमच्या पाठिमागील बाजूस तयार फर्निचरचे गोडावून आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने शोरूम बंद होते. गुरूवारी दुपारी शोरूमच्या पाठीमागील बाजूच्या गोडावूनमधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. शोरूमच्या शेजारील रहिवाशांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी या घटनेची खबर मालकासह पोलिसांना दिली. दुपारी एकच्या सुमारास उन्हाचा तडाखा मोठा असल्याने आग प्रचंड वेगाने वाढत गेली. लाकडी फर्निचर, गाद्या, पडदे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. नागरिकांनी ही बाब मलकापूर नगरपरिषद प्रशासनासह कराड नगरपालिका, कृष्णा हॉस्पिटल, अग्निशामक दल व कराड नगरपालिकेच्या अग्निग्नशामक दलाला कळविले. त्याच वेळेला पोलिसांनाही याबाबतची खबर देण्यात आली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे धुराचे मोठय़ा
प्रमाणावर लोट बाहेर पडून आकाशात झेपावत होते. आकाशात लांबपर्यंत धुराचे लोट पसरलेले दिसून येत होते. आठ ते दहा किलोमीटर लांबूनही धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांनी त्या दिशेने धाव घेतली.
अर्ध्या तासात आग सर्वत्र पसरली
काही कालावधीतच मलकापूरमधील लोटस फर्निचरला आग लागल्याची वार्ता वायासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली. सुमारे अर्ध्या तासातच आगीने शोरूमचा निम्मा भाग व्यापला होता. भर दुपारी उन्हाची तीव्रता मोठय़ा प्रमाणावर जाणवत असतानाच आगीचे लोळ बाहेर पडत होते. त्यामुळे आग झपाटय़ाने पसरत होती. घटनास्थळी आग वाढत असतानाच पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही क्षणातच कराड नगरपालिका तसेच कृष्णा हॉस्पिटल येथील अग्निग्नशामक दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु आगीचे तांडव सुरूच होते. आग आटोक्यात येत नाही असे लक्षात येताच पोलिसांनी आणखी अग्निग्नशामक दलाच्या गाडय़ा पाचारण करण्याचे आवाहन केले. त्यानुसार कृष्णा कारखान्याच्या अग्निग्नशामक दलाला माहिती देऊन गाडी बोलवण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत कृष्णा हॉस्पिटल व कराड नगरपालिका यांच्या अग्निग्नशामक गाडीतील पाणी संपले. त्यामुळे मलकापूर नगरपालिकेने तेथून जवळच गाडी भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे अग्निग्नशामक दलाच्या गाडय़ा पाणी भरून त्वरित पुन्हा घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत कृष्णा कारखान्याची गाडीही घटनास्थळी दाखल झाली. सुमारे चार अग्निशामक दलाच्या गाडय़ांच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी साडेतीन तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आगीचे लोट, उन्हाची तीव्रता यामुळे पाण्याचे फवारे मारतांना अग्निशामक दलाच्या कर्मचाऱयांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
आग आटोक्यात आणण्यासाठी भिंत तोडली
आग विझली असे वाटत असतानाच पुन्हा कुठून तरी धुराचे लोट व आग बाहेर पडत होती. हळूहळू आग पसरत असतानाच बाहेरून पाण्याचे फवारे मारून आग लवकर आटोक्यात येणार नाही. हे लक्षात येताच काही नागरिकांनी शोरूमचे दोन भाग करण्यासाठी जेसीबी आणला. जेसीबीच्या साह्याने आग लागलेला भाग इतर शोरूमपासून बाजूला करण्याचे काम सुरू झाले. शोरूमची भिंत तोडून जेसीबीने आगीपासून उर्वरित शोरूम वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्याच वेळेला तोडलेल्या भिंतीमधून अग्निशामक दलाने आतमध्ये जाऊन पाण्याचे फवारे मारले.
शोरुमच्या दक्षिण बाजूने आग लावणारे आग आटोक्यात आली. परंतु उत्तर बाजूने आगीचे रौद्ररूप सुरू होते. त्यामुळे पुन्हा उत्तर बाजूने ही शोरूमची भिंत जीसीबीने पाडून पाण्याचे फवारे आतमध्ये मारण्यात आले. सुमारे साडेतीन तास आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू होते. तरीही शोरूमच्या पाठीमागे असलेला मोठय़ा प्रमाणावर फर्निचरचा साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीमुळे लोटस फर्निचरचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले आहे. भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग कशामुळे लागली प्रथमदर्शनी समजू शकले नाही. तरीही शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होते.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी
आग लागण्याचे समजतात मलकापूरसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यातच आशियाई महामार्गावरून जाणाऱया लोकांनी वाहने थांबवून घटनास्थळी गर्दी केली. लोकांची गर्दी व अस्ताव्यस्त उभा केलेल्या वाहनांमुळे अग्निशामक गाडीला घटनास्थळी पोचण्यास अडथळे निर्माण झाले. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळाची गर्दी पांगविण्यासाठी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोक पळत सुटले. त्यातच महामार्गावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाल्याने भरधाव वेगात येणाऱया वाहनांमुळे एखादी दुर्घटना घडू नये याचीही दक्षता पोलिसांना द्यावी लागत होती.
मुख्याधिकारी, नगरसेवकांचेही प्रयत्न
लोटस् फर्निचरला आग लागल्याची माहिती मिळतात मलकापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. मुख्याधिकाऱयांच्या सूचनेनुसार नगरपरिषदेच्या कर्मचाऱयांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. काही कर्मचाऱयांनी चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून अग्निग्नशामक दलाच्या गाडय़ा भरून देण्यास मदत केली. विरोधी पक्षनेते अजित थोरात यांनी युवकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी धडपड केली. तसेच घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे युवराज धर्मे यांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
बघ्यांच्या गर्दीवर लाठीमार
लोटस फर्निचरला आग लागल्यानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. हायवेलगत असल्याने शेकडो वाहनधारकांसह स्थानिक नागरिक मोबाईलवर आगीचे शुटींग करत होते. बघ्यांच्या या गर्दीमुळे महामार्गासह सेवारस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. गर्दीमुळे आग आटोक्यात ठेवण्यात अडथळा येत होता. त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
धडकी भरवणारे धुराचे लोट लोटस फर्निचरला आग लागल्यानंतर आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. त्यामुळे धुराचे लोट मोठय़ा प्रमाणात हवेत दिसत होते. कराडच्या कोल्हापूर नाक्यापासून धुराचे लोट दिसत होते. यावरून आगीची दाहकता दिसून येत होती. धडकी भरवणारे हे धुराचे लोट चार तास वाढतच जात होते.