भव्य मिरवणूक,स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश
प्रतिनिधी / फोंडा
शासकीय पातळीवरील राज्य स्तरीय शिव जयंती उत्सव शुक्रवार 19 फेब्रु. रोजी फर्मागुडी येथे साजरा करण्यात येणार आहे. सकाळी 7.30 वा. शिव प्रेमींकडून फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिर ते फर्मागुडी किल्ल्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर 8.45 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते फर्मागुडी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल.
कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी फर्मागुडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवजयंतीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. यावेळी माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकर, आयोजन समितीचे सदस्य पत्रकार नरेंद्र तारी व जगन्नाथ मुळवी हे उपस्थित होते.
सकाळी होणाऱया मुख्य सोहळय़ाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर, शिरोडय़ाचे आमदार सुभाष शिरोडकर, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव संजय कुमार, बांदोडय़ाचे सरपंच राजेश नाईक, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, कवळे जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, प्रियोळ जि. पं. सदस्य दामोदर नाईक व बेतकी खांडोळा जि. पं. सदस्य श्रमेश भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी बाल भवनच्या मुलांतर्फे पोवाडे तर जगदंब ढोल ताशा पथक खडपाबांध फोंडा आणि जगदंब ढोल ताशा पथक गोवा यांच्यातर्फे ढोल ताशा वादन सादर करण्यात येईल. त्यानंतर गोपाळ गणपती देवस्थानच्या प्रांगणात होणाऱया मुख्य कार्यक्रमात मुंबई येथील इतिहासाचे अभ्यासक चंद्रशेखर पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर व्याख्यान होईल. मुख्य कार्यक्रमानंतर शिव छत्रपतींच्या इतिहासावर आधारीत आंतर महाविद्यालयीन प्रश्न मंजुषा स्पर्धा होईल. याशिवाय हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सवेश नाटय़प्रवेश स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येतील.
राज्यातील विविध भागात ऐतिहासिक नाटय़प्रयोग
रात्री मदनंत सावईवेरे निर्मित ‘इथे ओशाळला मृत्यू’ हा ऐतिहासिक नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल. याशिवाय गुरुवार 18 रोजी रवींद्र भवन कुडचडे येथे ‘सरनोबत’ हा नाटय़प्रयोग सार्वजनिक सरस्वती मंडळ कुंभारजुवातर्फे सादर करण्यात येईल. शुक्रवार 19 रोजी शिगांव कुळे येथे आदर्श कला संघ मळकर्णेतर्फे ‘आग्य्राहून दख्खन’, पेडणे येथे श्री महादेव कला मंच पालयेतर्फे ‘अजिंक्य छावा’, साखळी येथील रवींद्र भवनमध्ये खामिणी सांस्कृतिक मंडळ सावईवेरेतर्फे ‘शहा शिवाजी’, केरी सत्तरी येथे नाटय़रंग म्हापसा बार्देशतर्फे ‘आकाश मिठी’ व उसगांव येथे महालक्ष्मी युवक संघ तळावलीतर्फे ‘शिव गोमंतक’ हे नाटय़प्रयोग सादर होणार आहे. 20 रोजी कुंडई येथे वैरागी कला वृक्ष मडकईतर्फे ‘ही श्रींची इच्छा’, शिरोडा येथे सुयोग कला मंच करमळीतर्फे ‘शिव आलिंगन’ हे नाटय़प्रयोग होतील.
26 रोजी डिचोली येथे विमलानंद कला मंच मडकईतर्फे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, 28 रोजी माशेल येथे चौरंग नागेशी बांदोडातर्फे ‘स्वामी’, दाभाळ येथे देवताई कला क्रिएशन फोंडातर्फे ‘गरुड झेप’ हे नाटय़प्रयोग सादर होणार आहेत.