प्रतिनिधी/ फलटण
फलटण शहरात इंडियन प्रीमियर लिग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर सट्टा जोमात सुरू आहे परंतु आतापर्यंत एकाही सट्टा बुकींवर कारवाई करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे नक्की कोणाच्या आशिर्वादाने हा सट्टा सुरू आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
आयपीएल क्रिकेट सामने सुरू होऊन 10 दिवस झाले असून दररोज होणाया सामन्यावर लाखों रूपयांचा सट्टा लावण्यात येत आहे. शहरातील काही सट्टा बुकींनी फलटण शहरातील महात्मा फुले चौक,मलटण,घडसोली मैदान येथे विविध शाखा उघडल्याची माहिती समोर येत असून ऑनलाईन बँकींगवर ऑनलाईन सट्टा लावण्यात येत आहे.
फलटण शहरात दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी फलटण शहर पोलिसांनी कारवाई करीत काही सट्टा बुकी व सट्टा लावणा-यांना 12 जनांना पकडले. यातील काही जण फलटण शहरातील होते. परंतु, पोलिसांनी मोठया आरोपींना पडदयाचे मागेच ठेवले असल्याचा आरोप यावेळी उपस्थित झाला होता. योग्य पध्दतीने कारवाई केली असती तर अनेक व्हॉईट कॉलर आरोपी यावेळी समोर आले असते.परंतु, उघडपणे सूरु असलेल्या सट्टा व्यवसायिकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस समोर येतांना दिसून येत नाही.
मागील दीड वर्षांपासून कोरोना मुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटली असून अनेक तरुण मंडळी थोडय़ा वेळात जास्त पैसे कमवण्यासाठी आयपीएल क्रिकेट सामन्यावर लाखों रूपयांचा सट्टा लावत आहेत. अनेक सोशल मीडियावर ऑनलाईन सट्टा बाबत संदेशवहन सुरू असते अनेकांनी तर यासाठी सट्टा लावणाया तरुणांचे ग्रुप तयार केले आहेत यावर अनेकजण सामन्यावर अंदाजपत्रक व्यक्त करत असतात.
अत्यंत उघडपणे व दिवसाढवळ्या मोठय़ा प्रमाणावर होत असलेला हा आयपीएल क्रिकेट सट्टा बाजार पहाता यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने पोलिसांना याबाबत कल्पना ही नाही की काय असा प्रश्न उपस्थित राहत आहे.एकंदरीतच आयपीएल क्रिकेट सट्टा करणारी ही साखळी फार मोठय़ा प्रमाणावर आर्थिक तडजोड करत पसरली आहे व याकडे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
सट्टा लावण्यात तरुण पिढी आघाडीवर
या सट्टा प्रकरणात अनेक तरुण मुले सट्टा लावण्यात आघाडीवर असून यातच जिंकला तर ठीक आहे पण हरले तर कर्जबाजारी होऊन नैराश्य पोटी तरुण पिढी बरबाद होत असल्याचे दिसून येत आहे