प्रतिनिधी / फलटण :
फलटण पालिका प्रशासकीय राजवटीतील सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या 155 कोटी 11 लाख रूपयांच्या कोणतीही करवाढ नसलेल्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात शहरातील विविध भागातील पायाभूत सुविधांसाठी भरीव आर्थिक तरतुद करण्यात आली आहे.
सलग तिसऱ्या वर्षी कोणत्याही प्रकारची करवाढ न झाल्याने सर्वसमान्य नागरीकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. फलटण शहरातील जेवढे करदाते आहेत, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च नगर परिषद फलटण यांचे मार्फत करण्याबाबतची तरतुद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. फलटण पालिकेच्या संजीवराजे नाईक निंबाळकर या सभागृहामध्ये प्रशासक तथा नगरपालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा पार पडली. या सभेत सर्वप्रथम आरोग्य, पाणीपुरवठा, आस्थापना , जन्ममृत्यु व शहर विकास विभागाच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील मागण्यांचा गायकवाड यांनी आढावा घेतला.
शहराच्या विविधभागातील पायाभूत सुविधांसह रस्ते , गटारे, पाणीपुरवठा, दिवाबत्ती आदी सुविधासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. शहरातील खुल्या जागा, चौक यांचे सुशोभीकरण करून शहराचा कायापालट केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या ठळक तरतूदी पुढील प्रमाणे बाणगंगा नदी संवर्धन -1,00,00,000 / अमृत शहर योजना – 25,00,000 / आरोग्य सुविधा- 5,42,00,000 / पाणीपुरवठा विषयक सुविधा – 4,26,00,000 / माझी वसुंधरा अभियान 2022-50,00,000 / दिव्यांग कल्याण योजना 5 टक्के -27,66,203 / महिला बालकल्याण योजना 5 टक्के -27,66,203 / मागासवर्गीय दुर्बलघटक 5 टक्के 27,66,203 / कोरोना काळात घटलेली वसुली , चतुर्थ वार्षिक पाहणीचा खोळंबा ,मोठय़ा विकासकामांच्या योजनांची लोकवर्गणीमूळे खर्च यामुळे फलटण पालिकेच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडणार आहे. दरम्यान,नगर पालिकेने सलग तिसऱ्या वर्षी कोणत्याही प्रकारची करवाढ न केल्याने नागरीकांना दिलासा दिला आहे. तसेच मुद्रांक शुल्क , रस्ता अनुदान आणि कोर्ट अनुदान यांच्या थकबाकी रकमेतून नगर पालिकेस 5 कोटी रुपये मिळणार आहेत.