फलटण / प्रतिनिधी :
फलटण पूर्व भागातील अनेक गांवामध्ये गावठी दारू भट्टयांचे सम्राज्य पसरले आहे. या भागात दारूडय़ांनी गावातील शांतता आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजवले आहेत. पोलीसही संबंधितांवर किरकोळ पोलिसी कारवाई करत आपली अर्थव्यवस्था भक्कम करण्याच्या मागे लागले आहेत. त्यामुळे जणु काही पैसे उकळण्याचे दुकानच त्यांना शासनाने उघडून दिले की, काय असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
फलटण पूर्व भागासाठी बरड पोलीस दुरक्षेत्र नावाचे स्वतंत्र पोलीस ठाणे आहे. येथील पोलीस यंत्रणेवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. या भागात बेकायदा दारू धंदा आणि जुगाराने थैमान घातले आहे. दारूडय़ांच्या गदारोळात महिलांना संसार चालवावा लागत असल्याचे विदारक चित्र खेडयापाडयात दिसत आहे. याची दखल पोलीस घेणार की, पारंपरिक चाकोरीबद्ध कारवाई सुरु ठेवणार, असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक करत आहेत.