7 लाखांच्या रोख रकमेसह 15 लाखांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी/ फलटण
फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या आसु (ता. फलटण) येथील राहत्या निवासस्थानातून अज्ञात चोरटय़ांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकुण 15 लाख 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला असल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार शिवरुपराजे खर्डेकर (रा. आसु, ता. फलटण, जि. सातारा) यांना शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी जास्त पैशाची गरज होती. त्यामुळे त्यांनी दि. 6 जुलै रोजी 7 लाख रुपये आसू येथील राहत असलेल्या घरातील बेडरुमच्या आतील बाजुस असणाऱया खोलीतील लोखंडी कपाटात ठेवले होते. मात्र त्यानंतर दि. 12 जुलै रोजी कपाट उघडुन पाहिले असता सदरची रक्कम शिवरुपराजे यांना दिसली नाही. तसेच बाकी कपाटातील असणाऱया सर्व वस्तु कोणत्याही गेल्या नसल्याचे दिसून आल्यानंतर सदर रकमेबाबत घरातील लोकांसह कामाला असणाऱया व्यक्तींकडे चौकशी केली, परंतु सदर रकमेबाबत कोणीही माहिती दिली नाही. सदरची रोख रक्कम कोण घेऊन गेले असावे याबाबत तक्रारदार विचारविनिमय करीत होते. त्याबाबत त्यांनी घरातील लोकांचे व्यतिरिक्त इतर कोणासही सांगितले नाही.
दरम्यान, त्यानंतर दि. 29 जुलै रोजी शिवरुपराजेंच्या सुनबाईंनी त्यांना सांगितले की, त्यांचे बेडरुमच्या आतील बाजुस असणारे लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे मनीमंगळसूत्र, डायमंडचा नेकलेस, सोन्याची चेन व रोख रक्कम 50 हजार रुपये नसल्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार आणि घरातील लोकांनी त्यांच्या कपाटाची पाहणी केली. त्यावेळी त्यांचे कपाट कोणीतरी अज्ञाताने चावीने उघडुन आतील वस्तु लंपास करून पुन्हा कपाट बंद करुन ठेवल्याचे दिसले. त्यावेळी तक्रारदार शिवरुपराजे खर्डेकर यांची खात्री झाली की त्यांच्या घरातील कोणीतरी अज्ञाताने 7 लाख रोख रक्कम, सोन्याचे दागिने, डायमंडचा नेकलेस, पाच तोळा वजनाचे मनीमंगळसुत्र, चार तोळे वजनाची लेडीज चेन व रोख रक्कम 50 हजार रुपये असे एकूण 8 लाख 20 हजार रुपये असे दोन्ही ठिकाणचे मिळून 15 लाख 20 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला. याबाबतची फिर्याद शिवरूपराजे (खर्डेकर) निंबाळकरांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
पोलिसानी अज्ञात चोरटय़ाविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बरड पोलीस दूरक्षेत्राचे पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.