प्रतिनिधी/ पणजी
फलोत्पादन विकास महामंडळाने राज्यात मोठय़ा प्रमाणात भाजीपाला आणून आपल्या 1220 दालनांतून त्याची विक्री केल्याने राज्यातील जनतेची भाजी माफियांच्या तावडीतून सुटका झाली आणि त्याचबरोबर राज्यातील भाज्यांचे दरही धडाधड कोसळले.
सर्वसामान्य जनतेच्या ताटात कांदा, टॉमेटो आणि बटाटा या फळभाज्या दिसतात व त्या नसतात तर जेवणात रूची वाढत नाही व या फळभाज्या किमान गरजा भागविणाऱया आहेत. मात्र कांदे बटाटे व टॉमेटो हे रू. 70 प्रतिकिलो या भावाने विकण्यात आले. खासगीरित्या भाजी आणून रस्त्याच्याकडेला विकल्या तसेच भाजी दुकानदारांनी अक्षरशः जनतेला गेल्या काही दिवसांत लुटले. त्यामुळे गोमंतकीय जनता या लुटीला अक्षरशः कंटाळली. भाजी दरावर कोणाचेच नियंत्रण नाही हे पाहून ऐन संकटकाळी जनतेला लुटणाऱया भाजीविक्रेत्यांच्या तावडीतून जनतेला सुरक्षा हवी होती.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा फलोत्पादन विकास महामंडळाला भाजींचे 35 ट्रक बेळगावातून गोव्यात आणण्यास परवानगी दिल्याने राज्यातील विविध दालनात मंगळवारी भाजी पोहोचली आणि त्यामुळे खाजगी भाजीविक्रेत्यांचे कंबर मोडली. भाजीचे दर धडाधड कोसळले. बुधवारी राज्यात सुमारे 90 ट्रक भाजीचे पोहोचले व गुरूवारीदेखील सुमारे 100 ट्रक केवळ भाजीच गोव्यात पोहोचले. परिणामी भाजीचे दर नेहमीपेक्षा खाली उतरले आणि खासगी भाजी विक्रेत्यांना आपल्या दुकानावरही भाजीचे दर खूपच खाली उतरविण्याची पाळी आली.
पणजी मार्केट बंद झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला पणजी व आसपासच्या परिसरात बराच फायदा झाला. गेले तीन दिवस पणजी मार्केटमधील नेहमीचे भाजीमाफियांचे हातच बांधले गेले. त्यामुळे आपल्याकडील भाजी त्वरित विक्रीस यावी याकरिता भाजीची विक्री करणाऱयांनी अत्यल्प फायदा घेऊन भाजीची विक्री केले. पणजी मार्केटमधील भाजींचे दर गोव्यातील भाजीमाफिया ठरवित होते. त्यामुळे पणजी मार्केटमध्ये आधीचे दर पाहून इतर विक्रेते त्याप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा जास्त दराने भाजीची विक्री करायचे. आता मार्केट बंद असल्याने जे कोणी भाजी विक्री करतात ते फार कमी दरात भाजीची विक्री करत असल्याने या आणीबाणीच्या काळात नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने राज्यातील भाजी खाणाऱया सर्वांना फार मोठा दिलासा दिलेला आहे.
सध्या टॉमेटो, कांदा, बटाटा, चिटकी, घेवडा, वांगी, दोडकी, मिरची, भेंडी इत्यादी भाज्या उपलब्ध असून ग्राहकांनी चार दिवसांच्या भाजीचा साठा घरातील फ्रिजमध्ये करून ठेवलेला आहे.