तीन दिवस प्रदर्शन : रंगी-बेरंगी फुलांसह कलाकृतींची मांडणी
प्रतिनिधी /बेळगाव
बागायत खाते, जिल्हा पंचायत आणि बेळगाव जिल्हा बागायत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून 63 व्या फल-पुष्प प्रदर्शनाला उत्साहात प्रारंभ झाला. 3 दिवशीय प्रदर्शन क्लब रोड येथील हय़ुमपार्क येथे भरविण्यात आले आहे. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते फीत सोडून या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार अनिल बेनके, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही., कृषी खात्याचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यासह मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात रंगी-बेरंगी फुलांची रोपटी, फळे, भाज्या आणि फुलांच्या साहाय्याने आकर्षक कलाकृती साकारण्यात आली आहे. बागायत खात्याच्या परिसरात झेंडू, गुलाब, मोगरा, जास्वंदी, जुई, पाम यासह 35 हून अधिक जातीच्या फुलांची रोपटी ठेवण्यात आली आहेत. याबरोबरच परिसरात नंदी आणि विविध पक्षांवर फुलांनी कलाकृती साकारण्यात आली आहे. ही कलाकृती नागरिकांना भुरळ घालत आहे. शिवाय फुलांच्या सहाय्याने सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणप्रेमी सेल्फी घेत आहेत. विविध फळा-फुलांपासून युक्त्या लढवून आकर्षक कलाकृतींची माडणी करण्यात आली आहे.
याबरोबर मिरची, टोमॅटो, रताळी, केळी, पेरू, नारळ आणि कंदमुळे देखील ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी विविध जातींच्या फळा-फुलांची माहिती दिली जात आहे. शिवाय नवीन गार्डन तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
याबरोबरच विविध स्टॉल मांडण्यात आले आहे. नैसर्गिक मध, शिवाय फळा-फुलांच्या रोपटय़ाचे स्टॉल देखील उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. शोभिवंत, रंगी बेरंगी फुले नागरिकांना आकर्षित करत आहेत. बाग सजविण्यासाठी आधुनिक यंत्रांची माहिती देखील दिली जात आहे.
प्रदर्शनाचा लाभ घ्या
फल-पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी भेट देवून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, विविध फुले, फळे, भाजीपाला आणि आकर्षक कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना नवीन रोपटी आणि बाग सजविण्यासाठी मदत होईल.
महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते)