फळे ही आपल्या शरीरात एक महत्वाचे कार्य बजावतात. आरोग्याच्यादृष्टीने विविध फळांचे विविध गुणधर्म आहेत. सध्या हिवाळय़ाचे दिवस असून बाजारात विविध प्रकारच्या पालेभाज्यांसह रसरशीत आणि गोड फळांचे आगमनही झाले आहे. यामध्ये दाक्षे, अंजीर, किवी, स्ट्रॉबेरी अशा विविध, स्वादिष्ट आणि रंगीबेरंगी फळांचा समावेश आहे. त्यामुळे आठवडी बाजाराला फळांचा बहर आला आहे.
तासगाववरुन विक्रीला आलेली हिरवी आणि काळी दाक्षे तसे प्रत्येकाच्याच आवडीची असल्याने सध्या बाजारात द्राक्षांची चलती दिसून येत आहे. द्राक्षे वर्षभर खाणाऱयांसाठी उपलब्ध असली तरी हिवाळी हंगामात बाजारपेठेत त्याची आवक अधिक होताना दिसते. याचे उत्पादन सांगली, मिरज आदी ठिकाणी जोमाने घेतले जाते. आंबट आणि गोड अशा दोन चवीमध्ये द्राक्षे आढळतात. बाजारात हिरवी द्राक्षे 50 ते 70 रुपये किलो तर काळी द्राक्षे 80 ते 100 रुपये किलो दराने विकले जात आहेत.
अंजीर फळ हे आहारवेदानुसार पौष्टीक आणि गुणकारी फळ म्हणून ओळखले जाते. शिवापूर, सांगली, मुंबई आदी गावांमधून याची खरेदी केली जाऊन स्थानिक विक्रेत्यांकडून विक्री केली जाते. सध्या अंजीरदेखील बाजारात उपलब्ध झाले असून 220 रुपये किलो दराने अंजीर बाजारात विकले जात आहेत. रक्तशुद्धीकरणास व रक्तवाढीसाठी अंजीर उपयुक्त आहे. सुका मेवा म्हणूनही याचा वापर केला जातो.
लालसर गडद गुलाबी रंगाची व टपोऱया आकाराची स्ट्रॉबेरी सर्वांनाच आवडते याची आंबट गोड चव चाखण्यासाठी अगदी बालचमुंपासून थोरांपर्यंतचे लोक आतुरलेले असतात. सध्या बाजारात स्ट्रॉबेरीची चलती असल्याने बाजारात याची आवक वाढली आहे. महाबळेश्वरसारख्या पर्यटनस्थळी याचे उत्पादन सर्वांत जास्त प्रमाणात घेतले जाते. येथून याची विक्री इतर बाजारात केली जाते. याच्या सेवनाने चेहरा उजळतो. शिवाय रक्तवाढीस मदत होते. 50 ते 60 रुपयांपासून अगदी 100 रुपये पर्यंतच्या प्लॅस्टिक बॉक्समधून स्ट्रॉबेरी विकली जात आहेत.
किवी हे फळ तसे प्रत्येकाच्याच परिचयाचे आहे. याची देखील आवक सध्या बाजारात वाढलेली दिसून येत आहे. किवी फळ हिरवे चॉकलेटी रंगाचे आंबट गोड फळ आहे. हे फळ मुळात चीनमधील असून ते राष्ट्रीय फळ म्हणून ओळखले जाते. याची चव अन्य फळांपेक्षा वेगळी असून शरीरातील पेशी वाढविण्यासाठी या फळाचा उपयोग होतो. किवी हे फळ 100 रु. ते 120 रुपये दराने प्लास्टिकच्या बॉक्समधून विकले जाते. अशा विविध आणि स्वादिष्ट फळांनी शनिवारचा आठवडी बाजार फुलून गेला आहे.
शिवानी पाटील