प्रतिनिधी/ सातारा
मालोजीनगर (ता.फलटण) येथील महिलेला जातीवाचक वागणूक दिल्याबद्दल आणि फसवणूक केल्याबद्दल साताऱयातल्या डॉक्टर दाम्पत्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने 1 वर्षाचा कारावास व 5 हजाराचा दंड, दंड न दिल्यास 1 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फलटण शहर पोलीस ठाण्यात डॉ. प्रशांत चंद्रकांत काळे, डॉ. तनुजा प्रशांत काळे ( दोघे रा.पोवई नाका सातारा) यांच्या विरुद्ध श्रीमती सरोजिनी अविनाश शिंदे (वय 35 रा.मालोजीनगर फलटण) हिने फिर्याद दाखल केली होती. बांधण्यात येणाऱया सत्य रेसिडनसी अपार्टमेन्टमध्ये कराराप्रमाणे व नोटरीप्रमाणे श्रींमती शिंदे यांच्या वाटय़ाला येणारे पहिल्या व दुसऱया मजल्यावरील प्रत्येकी एक प्लॅट व 40 टक्के पार्किंग जागा व 3 लाख रुपये न देता फसवणूक केली. 2014 मध्ये श्रीमती शिंदे यांना त्यांच्या पतीसमोर डॉ. प्रशांत काळे याने तुम्ही पारध्यांनो तुम्हाला काय करायचं ते करा मी जातिवंत मराठा आहे. चोऱया-माऱया करून पालात रहायचं सोडून बंगल्यात राहायला येताय का?, तुम्हाला बांधकाम करू देत नाही, म्हणून जातीवाचक शिवीगाळ दमदाटी केली, याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. याचा तपास फलटणचे तत्कालीन डी. वाय. एस.पी. राहुल माकनिकर यांनी करून न्यायालयात दोषरोप पत्र दाखल केले.
हा खटला दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्या कोर्टात चालला होता. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील एल. के. खाडे यांनी कामकाज पाहिले. 7 साक्षीदार तपासले. केवळ परिस्थितीजन्य पुरावे पाहून आणि साक्षीदार यांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा चौथा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने फसवणूक आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपींना 1 वर्ष कारावास व 5 हजार दंड, दंड न दिल्यास 1 महिन्याची सक्तमजुरी शिक्षा सुनावली. फलटणचे डीवायएसपी तानाजी बरडे, फलटणचे पोलीस निरीक्षक दादाराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांनी काम पाहिले. तर पोलीस प्रोस्युक्युशन स्कोडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हवालदार शमशउद्दीन शेख, गजानन फरांदे, मंजूर मणेर, रहीनबी शेख, राजेंद्र कुंभार, अश्विनी घोरपडे, अमित भरते यांनी परिश्रम घेतले.