सीआयडी विभागाची कारवाई : कोठडीत घेऊन चौकशी सुरू, कोटय़वधींची फसवणूक केल्याचा आरोप
प्रतिनिधी / बेळगाव
नवे अपार्टमेंट व कॉम्प्लेक्स बांधण्याचे सांगून कोटय़वधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून सीआयडीच्या अधिकाऱयांनी आझमनगर येथील पिता-पुत्राला बेंगळूर येथे अटक केली आहे. सध्या त्यांना कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
मोहम्मद अब्बासहुसेन शेख (वय 55), त्याचा मुलगा मोहम्मद शाहिद मोहम्मद अब्बास शेख (वय 25) दोघेही राहणार आझमनगर चौथा क्रॉस अशी त्यांची नावे आहेत. सीआयडीचे पोलीस निरीक्षक एस. के. कुरगोडी, गजानन शिरसंगी, जगदीश बागण्णावर, चिदंबर चट्टरकी आदींचा समावेश असलेल्या सीआयडीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मोहम्मद अब्बास व त्याचा मुलगा मोहम्मद शाहीदवर 2019 मध्ये एपीएमसी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या पिता-पुत्रांनी कॉम्प्लेक्स व अपार्टमेंट बांधण्याचे सांगून अनेकांकडून कोटय़वधी रुपये उचलले आहेत. त्यांचे पैसे परत केले नाहीत म्हणून एपीएमसी पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण मार्च-2020 मध्ये चौकशीसाठी सीआयडीकडे सोपविण्यात आले होते. तत्पूर्वी कर्जदारांचा तगादा वाढल्यामुळे मोहम्मद अब्बासने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वैद्यकीय उपचारानंतर त्याने बेळगाव सोडले होते. मोहम्मद अब्बास व त्याचा मुलगा सध्या कोठे आहेत, याचा उलगडा होत नव्हता. सीआयडीच्या अधिकाऱयांनी बेंगळूर येथे त्यांना अटक केली आहे.
अनेकांकडून व्याजाने पैसे उचलले
आझमनगर, विद्यागिरी आणि शेट्टी गल्ली परिसरात कॉम्प्लेक्स बांधण्याचे सांगून या दोघा जणांनी अनेकांकडून पैसे उचलल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली. सध्या कोठडीत घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या दोघा जणांनी बांधकामासाठी अनेकांकडून व्याजाने पैसे उचलले होते. या पिता-पुत्रांना इतर ठिकाणी मोठय़ा प्रमाणात व्याजभरणा करावा लागल्यामुळे त्यांचे आर्थिक गणित पुरते कोलमडले होते. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. सीआयडीचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत.