अथणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल : सहाहून अधिक कंपन्यांविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी / बेळगाव
झटपट पैशांच्या मोहापाई गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱया काही कंपन्यांविरुद्ध गेल्या महिन्यात जिल्हय़ातील वेगवेगळय़ा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या पुढाकारातून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता याप्रकरणी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अथणी येथील हल्ल्याळ रोडवर असलेल्या मोहन ज्योती वनमार्ट रिटेल इंडिया प्रा. लि. या कंपनीविरुद्ध भा.दं.वि. 420, 511 सहकलम 34 व 21 (1), 21(2), बॅनिंग ऑफ इनरेग्युलेटेड डिपॉजिट स्कीम्स कायदा-2019 अन्वये संबंधित कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना यासंबंधी माहिती देण्याचे आवाहन अथणी पोलिसांनी केले आहे.
या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवणूक केल्यानंतर दरमहा पुढचे एक वर्ष 5 हजार रुपये परतावा देण्याचे सांगून या कंपनीने मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करून घेतली आहे. आपल्यानंतर 1 लाखाचा ग्राहक आणणाऱयाला दरमहा 7 हजार रुपये कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. 1 वर्षानंतर मूळ रक्कमही परत करण्यात येईल, अशी कंपनीने ग्वाही दिली होती.
गुंतवणुकीच्या बदल्यात हमीपत्र, बॉण्ड व धनादेश देण्यात आले आहेत. सरकारकडून यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. फसवणूक करण्यासाठीच असा व्यवहार थाटल्याचा संशय आल्याने पोलिसांनी स्वतःहून एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून गुंतवणूकदारांनी व फशी पडलेल्या नागरिकांनी कागदपत्रांसह यासंबंधी माहिती द्यावी, असे आवाहन अथणी पोलिसांनी केले आहे. मंडल पोलीस निरीक्षक शंकरगौडा बसनगौडर यांची पोलीस स्थानकात प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 08289-251203 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गोकाक, अथणी, चिकोडी, बेळगाव येथील सहाहून अधिक कंपन्यांविरुद्ध एफआयआर दाखल झाला आहे.