कारवार जिल्हा पोलीसप्रमुख शिवप्रकाश देवराजू यांची माहिती : हुबळी येथून घेतले ताब्यात, अमोघा टेडर्सच्या नावाखाली फसवणूक
प्रतिनिधी / कारवार
अमोघा टेडर्सच्या नावाखाली येथील 130 ग्राहकांची 19 लाख रुपये घेऊन फसवणूक केलेल्या तामिळनाडूतील सहा जणांच्या टोळीतील एका व्यक्तीला हुबळी येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती कारवार जिल्हा पोलीसप्रमुख शिवप्रकाश देवराजू यांनी दिली. ते आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव शिवराजू रिंगरसू (वय 38) असे आहे. अलिकडेच लागू केलेल्या बीयुडीएस (बॅनिंग ऑफ अनरेगुलेटेड डिपॉझिट ऍक्ट 2017) अंतर्गत या फसवणूक बाबतीत दाखल केलेल्या तक्रारीन्वये फसवणुकीची रुपरेषा आखायच्या टप्प्यातच प्रकरणाला वाचा फोडण्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे, असे स्पष्ट करून देवराजू पुढे म्हणाले. याप्रकरणी हुबळी येथे रिंगरसू याला ताब्यात घेतले असून अन्य व्यक्ती तामिळनाडूतील तंजावर येथील असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे.
ताब्यात घेतलेल्या रिंगरसू, नासीर आणि गोविंद राजू यांनी काजुबाग-कारवार येथील गणपती अणवेकर यांच्या मालकीचा गाळा भाडय़ाने घेतला आणि फेब्रुवारी 2021 रोजी अमोघ ट्रेडर्स नावाखाली दुकान सुरू केले. दुकानात दैनंदिन वापरातील वस्तुसह इलेक्ट्रॉनिक वस्तू फर्निचर, महागडी भांडी ठेऊन या सर्व वस्तू 45 टक्के कमी दरात विक्री करण्याची जोरदार जाहिरात केली. केवळ तामिळ भाषा अवगत असलेल्या भामटय़ांनी दुकानात काही स्थानिक युवकांची नेमणूक केली. अमिषाला बळी पडून येथील काही ग्राहकांनी हजारो रुपये गुंतवून बुकिंग केले. सुरुवातीला काही ग्राहकांना कमी दरात वस्तूंची विक्रीही करण्यात आली. अशाप्रकारे नगरातील सुमारे 130 ग्राहकांनी सुमारे 19 लाख रुपये देऊन वेगवेगळ्या वस्तूसाठी बुकिंग केले. शेवटी त्या भामटय़ांचे खरे रुप पहायला मिळाले. आठवडय़ापूर्वी दुकानाला कुलूप लाऊन येथून ते फरारी झाले.
समर्थ नेताळकर यांनी दाखल केली तक्रार
त्या भामटय़ांच्या अमिषाला बळी पडून फसवणूक झालेल्यापैकी माडीबाग-कडवाड येथील रहिवासी आणि व्ही गार्ड कंपनीची सामुग्री दुरुस्ती करणाऱया समर्थ नेताळकर यांनी 12 मार्च 2021 रोजी त्या भामटय़ांच्या विरोधात कारवार शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. नेताळकर यांनी 1 लाख 13 हजार रुपये देऊन सोफा, लोखंडी कपाट, वॉशिंग मशीन, लोखंडी कॉट आणि अन्य घरगुती साहित्य खरेदीसाठी बुकिंग केले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे गतीने फिरविली असता त्या टोळीतील एकाला हुबळी येथे ताब्यात घेण्यात आले. तर टोळीतील अन्य व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास जिल्हा पोलीस प्रमुख देवराजू यांनी पुढे व्यक्त
केला.
जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख एस. बदीनाथ, कारवारचे डीवायएसपी अरविंद कलगुज्जी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवार पोलीस ठाण्याचे मंडळ पोलीस निरीक्षक संतोष शेट्टी, पीएसआय संतोष कुमार, एस. बी. पुजारी यांच्यासह कर्मचाऱयांचा समावेश असलेल्या चौकशी पथकाची रचना करून ही कारवाई केल्याची माहिती पुढे देवराजू यांनी दिली.