क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
हिरो आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज मंगळवारी फातोर्डा स्टेडियमवर हैदराबाद एफसी संघासमोर ओडिशा एफसीचे आव्हान असेल. बलाढय़ मुंबई सिटी एफसीला गोलशून्य बरोबरीत रोखत हैदराबाद एफसीनी बाद फेरीच्या आशा उंचावल्या आहेत. सध्या हैदराबाद 16 गुणांनी तिसऱया तर ओडिशा एफसीचा संघ 6 गुणांनी शेवटच्या स्थानावर आहे.
मुंबईविरूद्धच्या सामन्यात हैदराबादला एकच गुण मिळाला असला तरी त्यांच्यासाठी या सामन्या अनेक जमेच्या बाजू होत्या. मोसमातील सर्वांत कठीण सामन्यात त्यांनी जिद्दीने खेळ केला. मोसमातील तिसऱया क्लीन शीटची नोंद त्यांनी केली. मोसमात आतापर्यंत सर्वाधिक गोल पेलेल्या संघाला गोलशून्य बरोबरीत रोखणे ही त्यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. खरे तर संधींचे गोलमध्ये रूपांतर केले असते तर हैदराबादला तीन गुणांची कमाईही झाली असती.
पहिल्या स्थानावरील मुंबईविरुद्ध आपल्या संघाने कामगिरी उंचावल्यामुळे हैदराबादचे प्रशिक्षक मान्यूएल मार्क्वेझ यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. तळातील ओडिशाला हरविल्यास हैदराबाद तिसऱया स्थानावर असलेल्या एफसी गोवाला गुणांवर गाठू शकेल. मुंबईसारख्या संघाविरुद्ध आम्हाला जिंकायचे होते, पण एकूण निकाल चांगला लागला. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला आहे. संघाची कामगिरी शारीरिक, तांत्रिक आणि डावपेचात्मक अशा सर्वच क्षेत्रांत फार चांगली झाली, असे मार्क्वेझ म्हणाले.
पहिल्या टप्प्यात हे संघ याआधी आमनेसामने आले होते, तेव्हा ओडिशाला दुखापतींचा फटका बसला होता. त्यावेळी आरीदाने सँटाना याच्या पेनल्टीवरील गोलमुळे हैदराबादने बाजी मारली होते. आता फॉर्म ही त्यांची जमेची बाजू असल्यामुळे हैदराबादचे पारडे जड असेल.
ओडिशाचा संघ मागील काही सामन्यांपासून चांगला खेळ करत आहे. त्यांचा संघ तळात आहे तरी या स्पर्धेत ते कुणाविरुद्धही जिंकू किंवा हरू शकतात, हे स्पर्धेवर लक्ष ठेवलेल्या सर्व चाहत्यांना माहीत आहे. ओडिशाला मागील सामन्यात चेन्नईनकडून निराशाजनक हार पत्करावी लागली होती. मोसमातील तो त्यांचा सातवा पराभव होता. या स्पर्धेत सहभागी संघांत सर्वाधिक पराभव त्यांना पत्करावे लागले आहेत.
पारडे प्रतिकूल असूनही ओडिशाचे प्रशिक्षक स्टुअर्ट बॅक्सटर यांना संघाच्या कामगिरीत सुधारणा होण्याची आशा आहे. हैदराबाद हा स्पर्धेतील परिपूर्ण संघांमध्ये समाविष्ट असल्याचे बॅक्सटर म्हणाले. हैदराबादविरुद्ध आधीच्या सामन्याच्यावेळी आमच्याकडे जो संघ होता तो पाहता आम्ही चांगला खेळ केला, पण एका चुकीमुळे पेनल्टीवर सामन्याचा निकाल लागला. यावेळी कामगिरीत सुधारणा होईल आणि हैदराबादला सरस झुंज देऊ, असे बॅक्सटर म्हणाले.