क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात आज मंगळवारी एससी ईस्ट बंगाल आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात लढत होणार आहे. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येईल. नॉर्थईस्टचे 18 सामन्यांतून सहा विजय, नऊ बरोबरी आणि तीन पराभवाने 27 गुण असून ते पाचव्या स्थानावर आहेत. ईस्ट बंगालचे 18 सामन्यांतून तीन विजय, आठ बरोबरी आणि सात पराभवाने 17 गुण झाले असून ते नवव्या स्थानावर आहेत.
ईस्ट बंगालचे आव्हान संपुष्टात आले आहे, तर नॉर्थईस्टला पुरेपूर संधी आहे. ईस्ट बंगालला चांगली संधी होती, पण आघाडीफळीने त्यांची निराशा केली. गेल्या महिनाभरात सहा लढतीत त्यांना केवळ पाच गोल करता आले आहेत. यात त्यांना टार्गेटच्या दिशेने केवळ 13 फटके मारता आले, जे प्रमाण सर्वांत कमी
आहे.
आता दोनच सामने बाकी असले तरी आपल्या संघाची खरी कसोटी असल्याचे साहाय्यक प्रशिक्षक टोनी ग्रँट यांना वाटते. या क्लबसाठी खेळायचे असल्यास तुम्हाला झोकून दय़ावे लागते. आपला दर्जा प्रदर्शित करण्याची आमच्या खेळाडूंना मोठी संधी आहे, असे ग्रँट म्हणाले. ईस्ट बंगालचा प्रतिस्पर्धी बाद फेरीच्या निर्धाराने खेळेल. नॉर्थईस्ट युनायटेडचा आतापर्यंतचा फॉर्म बघता हा सामना चुरशीचा होईल असा अंदाज आहे.
नॉर्थईस्टचा संघ उत्तम आहे. त्यांनी मोसमाचा प्रारंभ खरोखरच चांगला केला. त्यांनी भरती केलेले खेळाडू बघता संघात तरूण आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले संतुलन आहे. ते बाद फेरीसाठी प्रबळ दावेदार आहेत आणि त्या योग्यतेचा खेळ त्यांनी केला आहे. आमच्या खेळाडूंची खरी कसोटी लागेल. तुमचे खेळाडू किती क्षमतेचे आहेत हे जोखण्याची हीच सर्वोत्तम वेळ असते, असे ग्रँट म्हणाले.
आमच्या अनेक खेळाडूंनी आयएसएलमध्ये आधी भाग घेतला नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी हा पल्ला मोठा होता. पहिल्या दिवसापासून आम्ही निम्मे लक्ष पुढील मोसमाच्या तयारीवर ठेवले होते. प्रत्येक क्लबने असे करणे फार महत्वाचे असते, असे ग्रँड म्हणाले.
दुसरीकडे नॉर्थईस्टला कामगिरीत आणखी घसरण होऊन चालणार नाही. खलीद जमील यांच्याकडे सूत्रे आल्यापासून त्यांची वाटचाल स्वप्नवत ठरली आहे. सात सामन्यांत ते अपराजित आहेत. प्रामुख्याने आघाडीफळीच्या प्रभावामुळे हे घडले आहे. आगेकूच करण्यासाठी नॉर्थईस्टला उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील, पण सहाय्यक प्रशिक्षक ऍलिसन यांनी संघाने केवळ ईस्ट बंगालवर लक्ष केंद्रीत ठेवावे असे स्पष्ट केले. आम्ही ईस्ट बंगालनंतर केरळ ब्लास्टर्सविरूद्धच्या लढतीचा विचार करू, असे ऍलिसन म्हणाले.
आम्हाला फार चांगला खेळ करावा लागेल. आम्ही चांगला बचाव केला आहे तसेच आमचे आक्रमणही चांगले झाले आहे. आम्हाला संधी निर्माण करून त्याचा फायदा उठवावा लागेल. आम्हाला या सामन्यात गाफील राहून चालणार नाही. आम्हाला आमच्या क्षमतेचे प्रदर्शन करावे लागेल, असे ऍलिसन म्हणाले.