प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डा मतदारसंघात मतदारांकडून भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद सकारात्मक असून यावेळी फातोर्डा मतदारसंघात नक्कीच भाजपचे कमळ फुलणार असल्याचा विश्वास भाजपचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष आणि खा. तेजस्वी सुर्या यांनी व्यक्त केले. काल तेजस्वी सुर्या यांनी फातोर्डा मतदारसंघात उमेदवार दामू नाईक यांच्या सोबत घरोनघरी फिरून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या व दामू नाईक यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रसार माध्यमांशी बोलताना तेजस्वी सुर्या म्हणाले की, फातोर्डाचे उमेदवार दामू नाईक यांच्या सोबत घरोनघरी प्रचार करण्याचे भाग्य आपणास लाभले आहे. आपण ज्या ज्या घरांनी भेट दिली, त्याठिकाणी दामू नाईक यांना मतदारांकडून आदर मिळत असल्याने आपल्याला पूर्ण खात्री आहे की, दामू नाईक हे यावेळी मोठय़ा मताधिक्याने ही निवडणूक जिंकणार आहे.
गेल्या सात वर्षात नरेंद्र मोदी पतंप्रधान झाल्यानंतर देशात त्यांनी जे काम केले आहे. ते युवा वर्गासाठी अधिक असून त्यातून युवकांचे भवितव्य घडत आहे. त्यामुळे युवा वर्ग मोठय़ा संख्येने भाजपकडे आकर्षित झाला आहे. देशात विकासाची कामे होत आहेत. त्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, नवीन उद्योग व्यवसाय सुरू होत आहे. त्याचा सर्वाधिक लाभ हा देशातील युवा पिढीला होत आहे.
गोवा हे अत्यंत महत्वाचे राज्य असून गोव्यात पर्यटन, आयटी बीटी तसेच आघाडीच्या टेक्नोलॉजीच्या आपण गोष्टी करतो, त्यांच्यासाठी गोवा ही भव्य अशी प्रयोगशाळा ठरू शकते. सागरमाला प्रकल्पाचा उल्लेख यंदाच्या अर्थसकंल्पात करण्यात आलेला आहे. त्याचा लाभ गोव्यातील युवा पिढीला मोठय़ा उद्योग व्यवसाय तसेच रोजगाराच्या संधी प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दामू नाईक यांच्या प्रचारात आज युवा वर्ग मोठय़ा संख्येने उतरला आहे. दामू नाईक यांचा विजय नक्की आहे तसेच राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेवर येऊन हॅट्रीक करणार व युवा मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत हे पदभार सांभाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तेजस्वी सुर्या सोबत प्रभाग 5च्या नगरसेविका सौ. श्वेता लोटलीकर यांनी देखील दामू नाईक यांच्या प्रचारात भाग घेतला.