भाजपने नोकऱया विकून पात्र उमेदवारांना वंचित केल्याचा आरोप
प्रतिनिधी /मडगाव
भाजपने नोकऱया विकून पात्र उमेदवारांना वंचित केल्याचा आरोप करत फातोर्डा मतदारसंघातील अनेक भाजप युवा कार्यकर्त्यांनी रविवारी गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या युवकांचे स्वागत केले आणि त्यांना आश्वासन दिले की, त्यांचा पक्ष सत्तेत आल्यावर बेरोजगारीचा प्रश्न सोडवला जाईल आणि गोव्यात गुणवत्तेला स्थान दिले जाईल.
पक्षात प्रवेश केलेले पंकज उसगावकर म्हणाले की, भाजपने नोकऱया विकून गोव्यातील तरुणांवर अन्याय केला आहे. एवढा भ्रष्टाचार होईल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. त्यामुळे आम्ही भाजप सोडून गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे उसगावकर म्हणाले. भाजपने नोकऱया विकल्या आणि पात्र उमेदवारांना वंचित ठेवले, असे आशिष शिरोडकर म्हणाले. या कारणासाठी आम्ही सर्वांनी भाजपचा राजीनामा दिला आहे आणि चांगल्या भविष्यासाठी गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला आहे, असे शिरोडकर म्हणाले.
विकलेली सर्व पदे रद्द करू : सरदेसाई
सरदेसाई म्हणाले की, भाजपने नोकऱया विकल्या आणि युवकांचे भवितव्यही विकले. आम्ही सत्तेत आल्यानंतर भाजपने विकलेली ही सर्व पदे रद्द करू आणि नोकरी मिळवण्याकामी गुणवत्तेला स्थान मिळेल याची खात्री करू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गोव्यात असे युवक आहेत ज्यांना बहुराष्ट्रीय कंपन्या नोकरी देऊ शकतात, परंतु तसे होत नाही. म्हणूनच मी राज्यातील युवकांना खासगी क्षेत्रात 80 टक्के नोकऱया देण्यासाठी विधेयक मांडले होते. पण भाजप ते पुढे नेऊ शकले नाही, याकडे सरदेसाई यांनी लक्ष वेधले.
भाजप सरकारला गोव्यातील युवकांची काळजी नाही, असा आरोप सरदेसाई यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाच्याला एमबीबीएसच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी डीनवर दबाव टाकला. वैद्यकीय क्षेत्रात असा फेरफार करणाऱया व्यक्तीला लोकप्रतिनिधी होणे शोभते काय, असा प्रश्न त्यांनी केला. युवकांनी राजकारणात सहभागी होऊन परिवर्तन घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.