प्रतिनिधी / मडगाव
भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि दामू नाईक यांचे डबल इंजिन फातोर्डाची कामे थांबवून फ्युचर रेडी फातोर्डा मॉडेलमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप फातोर्डाचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गुरुवारी केला. सरदेसाई यांनी ही कामे सुरू करावीत म्हणून बुधवारी 24 तासांची मुदत दिली होती. गुरुवारी सकाळी पक्षाचे कार्यकर्ते व फातोर्डा येथील नागरिकांसह सरदेसाई यांनी फातोर्डा येथे रास्ता रोको करून भाजपच्या दादागिरीचा निषेध केला.
रास्ता रोको केल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. यावेळी आमदार सरदेसाई यांनी अधीक्षक अभियंत्यांना रस्त्यांची कामे बंद ठेवल्याबद्दल जाब विचारला असता त्यांनी रस्त्यांच्या कामांची कंत्राटे मिळालेल्या कंत्राटदारांशी संपर्क साधून कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. कामे सुरू करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर गोवा फॉरवर्डने आंदोलन मागे घेतले.
पोलिसांनी महिलांवर हात उचलल्याचा निषेध
रास्ता रोकोच्यावेळी पोलिसांनी महिलांवर हात उचलल्याचा दावा करून या कृतीचा सरदेसाई यांनी निषेध केला आहे. पोलीस एवढय़ा पातळीवर पोहोचले आहेत, की त्यांनी महिलांवर हल्ला केला आणि त्यांना मारहाण केली. पोलिसांचे हे बेकायदेशीर कृत्य आम्ही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.
भाजपकडून शासकीय यंत्रणेचा वापर
हताश झालेल्या भाजपने वैयक्तिक फायद्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर केला असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱयांचा वापर करून फातोर्डाची विकासकामे थांबवली आहेत, असा आरोप त्यांनी केला. फातोर्डातील जनतेला विकास हवा आहे, जो त्यांच्या संमतीने होत आहे. त्यामुळे गुरुवारी ते न्यायासाठी रस्त्यावर उतरले. ज्या विकासाला लोकांची संमती नसते त्याचा विरोध केला जाताना आपण पाहिलेले आहे. पण येथे फातोर्डात लोक रस्त्यावर उतरले, कारण सरकार त्यांच्या संमतीने पुढे गेलेल्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहे, असे सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले.
सरदेसाई यांनी बुधवारी फातोर्डा येथील नगरसेवकांसह पत्रकार परिषद घेऊन सुमारे 22 कोटींची कामे भाजपकडून रोखली जात असल्याचे आरोप केले होते. फातोर्डाच्या नगरसेवकांनीही काम बंद पाडण्यासाठी भाजप सरकारला जबाबदार धरले होते. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने दामू नाईक यांच्या सांगण्यावरून मुद्दाम बंद पाडलेली फातोर्डाची कामे 24 तासांत पुन्हा सुरू न केल्यास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यात चालू असलेल्या कामांबाबत तक्रारी करण्याचा आणि निषेध करण्याचा इशारा सरदेसाई यांनी त्यात दिला होता.
लोकांनी सूचविलेली कामे
‘संडे डायलॉग’ या कार्यक्रमातून फातोर्डा येथील लोकांनी ही कामे सूचविली होती. रस्ता रूंदीकरण, रस्ता हॉटमिक्सिंग, गटार आणि इतर अनेक कामे त्यात आहेत. या कामांचा फायदा फातोर्डातील जनतेला होणार आहे. मात्र, दामू नाईक यांच्या सांगण्यावरून भाजप सरकारने ही कामे बंद पाडली आहेत. आम्ही येथे फ्युचर रेडी फातोर्डा तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पण दामू नाईक आणि त्यांचे भाजप नेते अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
न्यायासाठी लढा चालूच राहणार
न्यायासाठी लढा चालूच राहणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले आणि महिलांवर बेकायदेशीरपणे हल्ला करणाऱया पोलीस अधिकाऱयांसह सर्व अधिकाऱयांना भाजप सत्तेतून बाहेर पडल्यावर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, इतर नगरसेवक, गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई, सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, दुर्गादास कामत, विकास भगत आणि इतर यावेळी उपस्थित होते.