प्रतिनिधी/ मडगाव
फातोर्डातून 10, तर मडगावातून 1 अशा एकूण 11 उमेदवारांनी शनिवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेस यांनी संयुक्तरीत्या मडगाव पालिका निवडणुकीत उतरविलेल्या ‘मडगाव सिव्हिक अलायन्स’ या आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला.
प्रभाग 1 मधून सुकूर फर्नांडिस व सय्यद जहुर, प्रभाग 3 मधून मोहद्दीनसाहेब उंटावाले, प्रभाग 5 मधून जनुआरिया फुर्तादो, प्रभाग 6 मधून रामचंद्र रेडकर, प्रभाग 7 मधून रूझारियो मेदेरा, प्रभाग 9 मधून साईनाथ कुट्टीकर, प्रभाग 10 मधून साईप्रसाद नाईक, तर प्रभाग 11 मधून शेख आबेदीन यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन फातोर्डा फॉरवर्डच्या, तर प्रभाग 15 मधून सिल्व्हेस्टर कुतिन्हो यांनी अर्ज मागे घेऊन मॉडेल मडगावच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
गोवा फॉरवर्डचे फातोर्डा गट अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांनी या उमेदवारांबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी गोवा फॉरवर्डच्या युवा आघाडीचे अध्यक्ष समीर शेख, माजी गट अध्यक्ष सुजय लोटलीकर तसेच माजी नगरसेवक ग्लेन आंद्राद व जुझे फर्नांडिस हे उपस्थित होते.
विजय सरदेसाई आणि मागचे नगरमंडळ यांनी फातोर्डात जी विकासकामे केली आहेत त्याने प्रभावित होऊन या उमेदवारांनी रिंगणातून माघार घेत आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती फर्नांडिस यांनी दिली. यासाठी प्रयत्न करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सिद्धनाथ बुयांव यांचे त्यांनी आभार मानले. तर आज जे आपण काँग्रेस उमेदवार म्हणून सांगत आहेत त्यांनी प्रत्येक निवडणुकीत भाजपसाठीच काम केले असून केवळ मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला मिळावा यासाठीच ते रिंगणात उभे आहेत, असा आरोप शेख यांनी केला.