प्रतिनिधी/ मडगाव
मडगाव पालिकेने गुरुवारी फातोर्डातील रवींद्र भवननजीकच्या एका गाडय़ाचा विस्तार हटविला. एका माजी नगरसेवकाचा मामा सदर गाडा चालवत होता. त्यामुळे सदर कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
माजी नगरसेवक रामदास हजारे यांच्या मामाच्या विरोधात राबविण्यात आलेली ही मोहीम राजकीय हेतूने पेरित असल्याचे दिसून येत आहे. मडगाव पालिकेतील सत्ताधारी गोवा फॉरवर्डचे मंडळ तसेच पालिका प्रशासनाच्या नजरेस आम्ही अनेक बेकायदेशीर गोष्टी लक्षात आणून दिल्या आहेत. अशा प्रकारचे शेकडो बेकायदा गाडे स्टेशन रोड, मडगाव आणि पालिका कार्यक्षेत्रातील इतर भागांमध्ये आहेत. मात्र सत्ताधारी मंडळ, नगराध्यक्षा पूजा नाईक आणि मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी फातोर्डातील याच गाडय़ाचा विस्तार हटविण्यासाठी का निवड केली, असा सवाल कारवाईच्या वेळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात येत होता.
पालिका मंडळाचा कार्यकाळ संपण्यास आठवडाभर राहिलेला असताना तसेच निवडणूक जवळ येत आहे तेव्हाच ही कारवाई करण्यात आल्याने सत्ताधारी गोवा फॉरवर्डच्या नगराध्यक्षा व पालिका प्रशासन यांच्याकडून झालेली ही कारवाई राजकीय हेतूने तर प्रेरित नाही ना असा संशय घेतला जात आहे. तसे नसल्यास नगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी एकत्रितपणे पालिका हद्दीतील अन्य शेकडो बेकायदा अतिक्रमणे व विस्तार या आठवडाभरात हटवून गुरुवारची ही कारवाई राजकीयदृष्टय़ा प्रेरित नव्हती हे स्पष्ट करावे अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत.
तक्रारीच्या आधारे कारवाई : नगराध्यक्षा, मुख्याधिकारी
नगराध्यक्षा नाईक यांची यासंदर्भात प्रतिक्रिया जाणली असता कित्येक महिन्यांपासून या बेकायदा विस्ताराबद्दल तक्रार होती असे त्यांनी सांगितले. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची टीका व्हायला लागली आहे. तसेच फातोर्डात व मडगावात यापेक्षा मोठे बेकायदा विस्तार व बेकायदा बांधकामे असून त्यावर कारवाई का होत नाही अशी विचारणा केली असता त्या उत्तर देऊ शकल्या नाहीत व मुख्याधिकाऱयांवर या कारवाईचे खापर त्यांनी फोडले. मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी त्या गाडय़ाच्या विस्तारासंबंधी व तेथे बेकायदा कृत्य होत असल्याची तक्रार होती याकडे लक्ष वेधले. त्यावर आधारून सदर कारवाई केल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.