प्रतिनिधी/ मडगाव
31 वर्षापूर्वी म्हणजे 1089 साली सुरु करण्यात आलेल्या फातोर्डा स्टेडियमवर एलसीडी दिवे बसविण्यासाठी ज्या ट्रकमधून ही विद्युत उपकरणे आणण्यात आली होती त्या ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यू आलेल्या 54 वर्षीय ट्रक चालकाचे नाव सुरेश असे असून तो मूळ मध्य प्रदेशातील गणेश नगर येथील आहे. फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमसाठी अधिकाऱयांनी एलसीडीची ऑर्डर दिली होती आणि हैद्राबाद येथील ‘जिओफास्ट ट्रान्सपोर्ट कंपनी’च्या एका ट्रकमधून वरील ट्रक चालक एलसीडी घेऊन आला होता.
5 नोव्हेंबर रोजी हा माल घेऊन ट्रक गोव्यात पोहोचला होता. पोलीस तपासात असे आढळून आले की 8 नोव्हेंबर रोजी ट्रक चालक सुरेश फातोर्डा येथील एका नाल्यात पडून गंभीररित्या जखमी झाला. त्याला सर्वप्रथम मडगावच्या सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले व नंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे बांबोळी येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू असताना 20 नोव्हेंबर रोजी या ट्रक चालकाला मृत्यू झाला.
ही अनैसर्गिक मृत्यूची घटना अशी पोलिसानी नोंद केलेली असून पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक पुढील तपास करीत आहे.
अनेक एलसीडी टीव्ही गायब झाल्याचे 2015 साली उघडकीस
आंतराष्ट्रीय क्रिकेट व आंतरराष्ट्रीय फूटबॉल सामने खेळण्याची आणि जवळ जवळ 19 हजार आसन क्षमतेची सोय असलेल्या फातोर्डा स्टेडियमध्ये अनेक एलसीडी टीव्ही गायब झाल्याची घटना फेब्रुवारी 2015 साली उघडकीस आली होती.
गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या देखरेखीखाली असलेल्या फातोर्डा स्टेडियममध्ये पाहुणे, पोलीस, स्टेडियम अधिकारी यांना क्रीडा सामने पाहता यावे यासाठी 37 एलसीडी टीव्ही बसविण्यात आले होते. मात्र इन्वेटरी (तपासणी) करण्यात आली तेव्हा 37 पैकी 6 एलसीडी टीव्ही गायब झाले असल्याचे आढळून आले होते. इतकेच नव्हे तर काही खुर्च्या आणि पंखेही गायब झाल्याचे 2015 साली आढळून आले होते.