राज्यांना पुरवठा करणार नसल्याचे कंपनीकडून स्पष्टीकरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात लसींची टंचाई जाणवत असल्याने अन्य देशांकडील लस उपलब्ध करण्यासाठी अनेक राज्यांनी धडपड सुरू केली आहे. मात्र, राज्यांच्या प्रयत्नांना अद्यापही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अमेरिकन लस उत्पादक फायजर आणि मॉडर्ना या कंपन्यानी राज्यांना लसींचा थेट पुरवठा करण्यास नकार दर्शवला आहे. आपण केवळ केंद्र सरकारलाच पुरवठा करणार असल्याचे स्पष्टीकरण अमेरिकन कंपन्यांनी दिल्यामुळे राज्यांची कोंडी झाली आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात आहे. भारतात सध्या ‘भारत बायोटेक’ची कोव्हॅक्सिन आणि ‘सीरम’च्या कोव्हिशिल्ड लसीचे डोस लाभार्थींना दिले जात आहेत. मात्र, या दोन्ही लसींचे उत्पादन व पुरवठा कमी असल्यामुळे अनेक लोक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच राज्यांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे काही राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा जारी करून लस आयातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, फायजर आणि मॉडर्ना या अमेरिकन कंपन्यांनी पंजाब आणि दिल्ली सरकारला लसपुरवठा करणार नसल्याचे कळवले आहे. याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.