ऑनलाईन टीम / लंडन :
लंडनमध्ये फायझरची कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर महिनाभरातच आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित बाधितानेच स्थानिक मीडियाला यासंदर्भात माहिती दिली.
डेविड लॉन्गडन असे बाधित आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव आहे. साऊथ वेल्स येथील ब्रिजेंडीमधील प्रिंसेज ऑफ वेल्स रुग्णालयामध्ये तो कार्यरत आहे. 8 डिसेंबर रोजी फायझरच्या लसीचा पहिला डोस त्याने घेतला होता. त्याला 5 जानेवारीला लसीचा दुसरा डोस देणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने जास्तीत जास्त लोकांना लस दिली जावी म्हणून दुसऱ्या डोसची तारीख पुढे ढकलली.
दरम्यानच्या काळात डेविडला कोरोनाची लागण झाली. डेविडला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले असून, त्याला कोरोनाची लागण कशी झाली, याचा शोध डॉक्टर घेत आहेत.