कंपनीचे प्रतिपादन, जगभरातील रूग्णांना दिलासा, अनेक देशांनी नोंदविली मागणी
कोरोना विषाणूचे अनेक नवे अवतार आता समोर येत असल्याने जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र फायझर लस या नव्या अवतारांसाठीही घातक ठरू शकते, असे प्रतिपादन या लसीची निर्मिती करणाऱया कंपनीने केले आहे. विशेषतः ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील रूग्णांना यामुळे मोठाच दिलासा मिळाला असून अनेक देशांनी मागणी नोंदविली आहे.
सध्या जगात अनेक कंपन्यांनी तयार केलेल्या लसी उपलब्ध होत आहेत. या सर्व लसींचे कार्य साधारणतः एकाच प्रकारे चालते. या लसी आपल्या शरिरात कोरोना विषाणू ओळखण्याची क्षमता निर्माण करतात. एकदा आपल्या चेता यंत्रणेला हे विषाणू आणि त्यांची पेशींमध्ये घुसणारी प्रथिने ओळखता आली, की, शरीर या विषाणूंचा नायनाट करणारी प्रतिजैविके सज्ज करते, ही प्रतिजैविके कोरोना विषाणूच्या पेशीत घुसणाऱया टोकांवर हल्ला करतात आणि विषाणूला निष्प्रभ करतात. यामुळे त्याची घातकता संपते आणि आपण सुरक्षित राहतो.
व्यापक परीक्षण
फायझर लसीचे कार्य कसे चालते याची अनेक परीक्षणे गेल्या एक महिन्याभरात करण्यात आली आहेत. या लसीची निर्मिती अमेरिकेत झाली आहे. सध्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या अवताराने थैमान घातले आहे. या नव्या रूपांतरीत विषाणूची प्रसार होण्याची क्षमता मोठी आहे. त्यामुळे जास्त संख्येने रूग्ण आढळत आहेत. मात्र, याची घात करण्याची तीव्रता पूर्वीच्या विषाणूप्रमाणेच किंवा त्याच्यापेक्षा काही प्रमाणात कमी आहे, असे सांगण्यात येते.
असे झाले प्रयोग
फायझर लसीच्या क्षमतेची परीक्षणे रक्तांच्या 20 नमुन्यांवर करण्यात आली. ही लस टोचून घेतलेल्या 20 जणांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले. या लसीमुळे या 20 जणांच्या रक्तामंध्ये प्रतिजैविके निर्माण झाली होती. ही प्रतिजैविके कोरोनाच्या नव्या विषाणूंचा नायनाट करण्यासही सक्षम आहेत, असे आढळून आले. प्रयोगशाळेत रक्तांच्या नमुन्यांचे निरीक्षण केले असता, रक्तात ही क्षमता निर्माण झाल्याचे आढळून आले. यामुळे संशोधकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अद्याप दुजोरा नाही
प्रयोग शाळेत केलेल्या या निरीक्षणांना अद्याप तज्ञ समितीचा दुजोरा मिळालेला नाही. तो मिळाल्याखेरीज या लसीच्या या वैशिष्टय़ाची प्रसिद्धी करता येणार नाही. मात्र, प्रयोगशाळेतील निरीक्षणे यशस्वी झाली असून लवकरच तज्ञांकडून त्यांना मान्यता मिळेल असा विश्वास ही लस निर्माण करणाऱया बायोएनटेकने केला आहे.
निदान या रूपावरतरी उपयोगी
सध्या ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या ज्या नव्या रूपाने हाहाकार उडविला आहे, त्या रूपावर तरी फायझरची लस उपयुक्त ठरत आहे. कोरोनाच्या विषाणूत आणखी परिवर्तन झाले तर ही लस त्यांवरही उपयुक्त ठरेल का, हे तशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच समजणार आहे. मात्र, सध्यापुरता तरी दिलासा या लसीमुळे मिळणार हे निश्चित आहे.
प्रयोग सुरूच राहणार
कोणताही विषाणू त्याच्या रूपात परिवर्तन करीत असतो. नव्या रूपाची कमजोरी ओळखून औषध किंवा लस तयार करण्यात येते. कोरोनाच्या रूपांमध्ये इतर विषाणूंपेक्षा जास्त वेगाने परिवर्तन होत आहे. हे संशोधकांसमोर मोठे आव्हान आहे. ते स्वीकारण्याच्या दृष्टीने संशोधकांची सज्जता आहे.
भारतातील लसींचे काय ?
भारतात सध्या ब्रिटनमध्ये विकसीन केलेल्या आणि भारतातील सिरम कंपनीत उत्पादन होत असलेल्या कोव्हीशिल्ड या लसीला मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पूर्णतः भारतात निर्माण करण्यात आलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिन या लसीलाही मान्यता देण्यात आली आहे. या लसीमध्येही कोरोनाच्या नव्या रूपाचा नायनाट करणाऱया प्रतिजैविकांची निर्मिती करण्याची क्षमता आहे, असे सांगण्यात येत आहे. या लसींवर या संदर्भात आणखी प्रयोग सुरू असून व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्यानंतरही हे प्रयोग सुरूच राहणार आहेत. फायझर प्रमाणे भारतीय लसीतही ही क्षमता असेल तर ही लस शोधणाऱया संशोधकांनी अद्वितीय कामगिरी केली आहे, असे मानण्यात येईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे. भारतात येत्या एक दोन आठवडय़ांमध्ये लसीकरण सुरू होणार आहे.