27 लाखांची केली फसवणूक
प्रतिनिधी/ सातारा
विविध फायनान्स कंपनीकडून ट्रक, टेम्पो, व इतर वाहनांसाठी कर्ज घेऊन ही वाहने परस्पर विक्री करणाऱया दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपी अब्दुलकादीर सय्यद (रा. सुपा पारनेर जि. अहमदनगर) यांच्यावर आणखी एका फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उन्मेष उल्हास शिर्के आणि अब्दुलकादिर मोहम्मद अली सय्यद या दोघांनी विविध फायनान्स कंपनीकडून वाहने खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. हे कर्ज घेऊन ट्रक, टेम्पो व इतर वाहने घेऊन यांचे हप्ते न भरता परस्पर ही वाहने विकली आहेत. यांच्याविरूद्ध इंडो स्टार कॅपिटल फायनान्स कंपनीचे सचिन बजरंग चव्हाण (रा. एकंबे ता. कोरेगाव) यांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी आणखी कोणत्या फायनान्स कंपनीची फसवणूक केली असल्यास संबंधितांनी समोर येऊन माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.
यानंतर रविवार दि. 6 रोजी चोलामंडळ फायनान्स शाखा सातारा व महिंद्रा फायनान्स कंपनीकडून अब्दुलकादीर सय्यद याने ट्रक हप्त्यावर घेऊन कर्जाचे हप्ते न भरता 27 लाख 70 हजार 610 रूपयांची फसवणूक केली. याचा गुन्हा दिपक लक्ष्मण धुमाळ (वय 53, करंजखोप ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात अब्दुलकादीर सय्यद यांच्यावर दाखल केला आहे. या गुह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार दगडे करत आहेत.