धीरज बरगे/कोल्हापूर
पाचगांव रोडवरील रायगड कॉलनी मित्र मंडळाकडून फायबरची मूर्ती अन् मदतीची कितीं अशा पद्धतीचा गणेशोत्सव गेल्या दहा वर्षांपासून साजरा करत आहे. गेल्या दहा वर्षांपासून फायबर गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करत पर्यावरण रक्षणाचा संदेश देत मंडळाने सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. गणेशमूर्तीसह आगमन आणि विसर्जन मिरवणूकीवरील खर्च टाळत विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. यंदाही मंडळाने रक्तदानाचे महत्त्व ओळखून रक्तदानसह आरोग्य तापसणी शिबिराचे आयोजन केले आहे. तसेच शिल्लक वर्गणीमधून रामानंद नगर येथे ओढÎाचे पाणी घरामध्ये शिरुन नुकसान झालेल्या कुटुंबांना रोख रक्कम स्वरुपात मदत करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
कोल्हापूराच्या गणेशोत्सवात शहरातील प्रमुख तालीम-मंडळे शहरवासियांच्या केंद्रस्थानी असतात. या मोठमोठया तालमींच्या मिरवणुका, त्यांच्याकडून राबविले जाणारे सामाजिक उपक्रम यांच्याही चर्चा शहरात रंगतात. शहरातील मंडळांच्या तुलनेत उपनगरातील मंडळांवर भव्यदिव्य स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्यात मर्यादा आहेत. तरीही येथील मंडळे आपआपल्या परीने भव्य स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात. उपनगरातील मंडळे चर्चेत येत नसली तरी काही मंडळाचे उपक्रम लक्षणीय असतात. पाचगांव रोडवरील रायगड कॉलनी मित्र मंडळाचा गणेशोत्सवही दखल घेण्यासारख आहे. फायबर गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करत मंडळाने प्रतिवर्षी गणेशमूर्तीवर होणाऱया खर्चात बचत केली. तसेच आगमन विसर्जन मिरवणुकीवरील खर्चही टाळत सामाजिक बांधिलिक मंडळाने जोपासली आहे. अशा पद्धतीने अन्य मंडळांनीही गणेशोत्सव साजरा केल्यास समाजातील गरजवंताना आधार मिळण्यास निश्चितच मदत होईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे.
आगमन, विसर्जन मिरवणुक खर्चातून समाजकार्य
गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवर मोठयाप्रमाणात खर्च होतो. मिरवणुकांवर होणार खर्च वायफळ असल्याचे लक्षात आल्यावर मंडळाने या खर्चातून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या दहा वर्षांपासून मंडळाकडून गणेश वर्गणीतून समाजातील गरजवंतांना पाठबळ देण्याचे काम सुरु आहे.
दरवर्षी पाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी
मंडळाकडून दरवर्षी पाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यात येते. समाजातील होतकरु विद्यर्थ्यांची निवड करुन वर्षभरासाठी त्यांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य मंडळाकडून पुरविले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मंडळाकडून हा उपक्रम प्रतिवर्षी राबविण्यात येतो.
फायबर मुर्ती प्रतिष्ठापनेचा विचार व्हावा
फायबर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणारे उपनगरातील आमचे पहिले मंडळ आहे. फायबर मुर्तीच्या प्रतिष्ठापनेमागे पर्यावरण रक्षणाचा हेतू आहे. शहरातील मंडळांनीही फायबर मूर्ती प्रतिष्ठापनेचा विचार केल्यास विसर्जनामुळे जलस्त्रोतांचे होणारे प्रदूषण टळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मंडळांनी फायबर गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी पुढाकर घेणे गरजेचे आहे.
– संदीप पाटील, अध्यक्ष रायगड कॉलनी मित्र मंडळ.
मंडळाकडून राबविले जाणारे सामाजिक उपक्रम असे ः
– आरोग्य शिबिरातून मोफत औषधोपचार
– रक्तदान शिबिर
– प्रतिवर्षी पाच विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याची मदत
– पूरचा फटका बसलेल्या नागरिकांना आर्थिक मदत
– प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिनी मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन