क्रिकेट संघटनेच्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेत घडलेल्या पैशाच्या अपहार प्रकरणी क्रियान्वयन संचालनालयाकडून (ईडी) नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची चौकशी करण्यात आली आहे. संचालनालयाच्या अधिकाऱयांनी सोमवारी सकाळी साधारणतः चार तास अब्दुल्लांची चौकशी केली. मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली, अशी माहिती देण्यात आली आहे.
हा मोठा घोटाळा असून या प्रकरणी सीबीआयने यापूर्वीच प्रथमदर्शनी अहवाल सादर केला आहे. तसेच जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेचे माजी कोषाधिकारी अहसान अहमद मिर्झा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. याशिवाय फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधातही आरोप ठेवण्यात आले आहेत. मंझूर गझनफर अली, बशीर अहमद मिसगर आणि गुलझार अहमद बेग या माजी पदाधिकाऱयांविरोधातही सीबीआय चौकशी करीत आहे. याच आधारावर क्रियान्वयन संचालनालयानेही अब्दुल्ला यांची चौकशी केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे घोटाळा
2005 ते 2012 या कालावधीत या क्रिकेट संघटनेला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) 94 कोटी रुपये देण्यात आले होते. राज्यात क्रिकेटचा विकास करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली होती. मात्र या रकमेपैकी बऱयाच मोठय़ा भागाचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. अपहार केलेली रक्कम विदेशी पाठविण्यात आल्याचाही संशय आहे. संघटनेच्या पदाधिकाऱयांनी संगनमताने हा अपहार केला, असे आरोपपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
राजकीय सूडाचा आरोप
आपल्याविरूद्धची कारवाई हा राजकीय सूडाचा प्रयत्न असल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला. राज्यात पाच पक्षांनी मिळून गुपकार संघटना स्थापन केली आहे. ही संघटना अनुच्छेद 370 च्या उच्चाटनाला विरोध करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आपल्या विरोधात आरोप लावल्याची टीका त्यांनी केली.