सोनट्टी येथील घटनेने खळबळ : काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी / बेळगाव
फार्महाऊसवर झोपलेल्या वॉचमनचा अज्ञातांनी गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा सोनट्टी (ता. बेळगाव) येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. हा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही.
लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय 45, रा. हन्नीकेरी, ता. बैलहोंगल) असे खून झालेल्या वॉचमनचे नाव आहे. त्याचा मुलगा बसवराज याने काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, पोलीस उपनिरीक्षक आर. टी. लक्कनगौडर आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सोनट्टीजवळील सुनील पाटील यांच्या फार्महाऊसवर रखवालदार म्हणून लक्ष्मण काम करत होता. रखवालदारीसह तो शेतीची कामेही करायचा. गेल्या 9 महिन्यांपूर्वी तो सोनट्टीत आला होता. त्याची पत्नी व मुले गावात राहतात. या फार्महाऊसवर तो एकटाच राहायचा. मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास त्याचा अज्ञातांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे.
घटनेची माहिती समजताच काकती पोलिसांना पाचारण करण्यात आले. लक्ष्मणचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. यासंबंधी बुधवारी रात्री काकती पोलिसांशी संपर्क साधला असता मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हन्नीकेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
48 तासांतील दुसरा खून…
ऐन दसरोत्सवादिवशी 25 ऑक्टोबर रोजी रात्री संगमेश्वरनगर येथील शैबाज पठाण (वय 24) या तरुणाचा तलवारीने वार करून शिवबसवनगर येथे खून करण्यात आला होता. याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सोनट्टी येथील फार्महाऊसवर खुनाचा दुसरा प्रकार घडला आहे. 48 तासांतील हा दुसरा खून आहे.