नावेली सदैव काँग्रेसचीच : चोडणकर ,फुर्तादो यांचे काँग्रेसमध्ये जोरदार स्वागत
प्रतिनिधी /पणजी
माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांच्या पक्षत्यागाची उणीव भरून काढत मंगळवारी माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी नावेलीचे संभाव्य उमेदवार म्हणून फुर्तादो यांना संमती मिळाल्याचे त्यांच्या प्रवेशावेळीच दिसून आले. फुर्तादो हे 2012 मध्ये नावेलीचे अपक्ष आमदार होते. त्यानंतर त्यांचा मनोहर पर्रीकर सरकारात समावेश होऊन मच्छीमार मंत्रीपदी वर्णीही लागली होती. 2017 च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा नावेलीतून उमेदवारी दाखल केली होती. परंतु लुईझीन फालेरो यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
सोमवारी घडलेल्या अनपेक्षित घटनेत लुईझीन फालेरो यांनी आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचाही राजीनामा सादर केल्यामुळे नावेली मतदारसंघात काँग्रेसला जोरदार धक्का बसला होता. मात्र 24 तासांच्या आत काँग्रेसने माजी मंत्री फुर्तादो यांना पक्षात प्रवेश देऊन फालेरोंची उणीव भरून काढली.
काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आल्तीन्य गोम्स आणि इतरांच्या उपस्थितीत फुर्तादो यांनी पणजीत काँग्रेस भवनात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी बोलताना फुर्तादो यांनी, फार पूर्वीपासून आपणास काँग्रेस पक्षात प्रवेश करून नावेली मतदारसंघात काम करण्याची इच्छा होती, असे सांगितले. मात्र 2017 मध्ये हार पत्करावी लागल्याने राजकारण सन्यास घेण्याचाही निर्णय घेतला होता, परंतु आपले कार्यकर्ते आणि मतदारांनी पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षाने उमेदवारी दिल्यास अवश्य निवडणूक लढविणार असे ते म्हणाले.
त्यावेळी बोलताना श्री. कामत यांनी क्रीडापटू असलेल्या फुर्तादो यांच्या प्रवेशामुळे पक्षास बळकटी मिळेल व आम्हालाही नव्या जोमाने काम करण्यासाठी स्फूर्ती मिळेल असे सांगितले.
नावेलीत आता युवा नेतृत्वास वाव : राव
श्री. राव यांनी राज्याला स्थीर सरकार देऊ शकेल असा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. अशा पक्षात प्रवेश केलेल्या श्री. फुर्तादो यांच्यामुळे नावेली मतदारसंघात युवा नेतृत्वास वाव मिळणार आहे, त्याचबरोबर त्या मतदारसंघाच्या विकासासही चालना मिळेल याबद्दल विश्वास आहे, असे ते म्हणाले. क्रीडापटू हे सदैव सकारात्मक विचार करणारे असतात. हार-जीत या दोन्हीना ते खेळाचा भाग म्हणून पाहतात. त्यामुळे ते कधीच दुःखी होत नाहीत, असेही श्री. राव म्हणाले.
नावेली काँग्रेसचीच
श्री. चोडणकर यांनी बोलताना, केवळ स्वार्थासाठी ऐनवेळी विश्वासघात करून काँग्रेसचा त्याग केलेल्या फालेरो यांच्या जाण्याने फुर्तादो यांच्यासाठी काँग्रेसची दारे खुली झाली. फालेरोंनी केवळ पक्षाचाच नव्हे तर स्वतःच्या मतदारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांचे जाणे हे एकाअर्थी बरेच झाले. सोमवारपासून नावेली मुक्त झाली. नव्या दमाच्या अनेक युवा नेत्यांना त्यामुळे काँग्रेससाठी काम करण्याची संधी मिळाली. नावेली मतदारसंघ सदैव काँग्रेसचाच होता व भविष्यातही काँग्रेसचाच राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.