एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
भीषण खूनप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या एका वृद्ध कैद्याचा शनिवारी आजाराने मृत्यू झाला आहे. म्हैसूर येथील त्याच्या नातेवाईकांना यासंबंधीची माहिती देण्यात आली असून रविवारी सकाळपर्यंत ते बेळगावला पोहोचणार आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
महम्मदइसाक उर्फ इसाकपाशा उर्फ इशादपाशा उर्फ यारो (वय 72, मूळचा रा. झांशी, उत्तरप्रदेश, सध्या रा. कल्याणगिरी, स्लम कॉलनी, म्हैसूर) असे त्याचे नाव आहे. गेल्या 10 वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणी म्हैसूर येथील अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती.
13 नोव्हेंबर 2009 रोजी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी त्याला हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. अलिकडे त्याची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी त्याला सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसीयु विभागात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शनिवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या संबंधी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील अधिकाऱयांनी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. म्हैसूर येथील त्याचे कुटुंबिय बेळगावला यायला निघाले आहेत. रविवारी सकाळपर्यंत ते बेळगावात पोहोचल्यानंतर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया करण्यात येणार आहे. महम्मदइसाक हा अनेक व्याधींनी त्रस्त होता.