नवी दिल्ली / वृत्तसंस्था
निर्भया प्रकरणातील दोषी ठरविण्यात आलेल्या मुकेश कुमार याची दया याचिका नाकारण्याच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेतली जाणार आहे. न्यायमूर्ती आर भानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे. निर्भया प्रकरणातील चारही दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यासंबंधीचे वॉरंट यापूर्वीच बजावण्यात आले आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांनी आरोपी मुकेशकुमारच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे निर्देश पुन्हा एकदा दिले आहेत. “एखाद्याला फाशी द्यायची असेल तर तातडीने सुनावणी घेण्यापेक्षाही महत्त्वाचे काहीही असू शकत नाही.’’ असे वक्तव्य सरन्यायाधीशांनी केले आहे. त्यामुळे मंगळवारच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे.