दिल्ली, मुंबई,चेन्नईसह अन्य शहरांमध्ये सोय : हैदराबादमधून प्रारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील टोलची वसूली करण्यासाठी फास्टॅगचा वापर सुरु करण्यात आला आहे. परंतु आता वाहन पार्किंगचे शुल्कही आकारण्याची नवीन सुविधा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) लवकरच दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि बेंगळूर यासारख्या शहरांमध्ये फास्टॅगच्या मदतीने सेवा देण्यास प्रारंभ करणार आहे.
सदरच्या सुविधेचा प्रारंभ हैदराबादमधील विमानतळापासून केला आहे. जिथे कार पार्किंगसह अन्य शुल्क आकारणी ही फास्टॅगद्वारे करण्यात येणार आहे. याला फास्टॅग 2.0 नाव देण्यात आले आहे. आता बँक एनपीसीआयसोबत हात मिळवणी करुन अन्य महानगरांमध्ये ही कॉन्टॅक्टलेस कार पार्किंगची सुविधा देण्याची तयारी फास्टॅग करीत आहे.
प्रारंभ सुविधेचा
जीएमआर हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्टवर फास्टॅगसोबत कॉन्टॅक्टलेस आणि इंटरऑपरेबल पार्किंगची सुविधा मिळत आहे. परंतु विमानतळावर पार्किग शुल्क देण्यासाठी नियम लागू आहे. जे नागरिक डिजिटल मोडचा वापर करणार नाहीत त्यांच्यासाठी काउंटरवर शुल्क देण्याची सोय असेल. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने नवीन गाडीची नोंदणी करण्यासाठी आणि नॅशनल परमिटच्या दरम्यान प्रमाणपत्रासाठी फास्टॅगचा तपशील देणे बंधनकारक केले आहे.