मारिहाळ, माळमारुती पोलिसांची कारवाई,10 लाख 72 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
मारिहाळ व माळमारुती पोलिसांनी चोऱया, घरफोडय़ाप्रकरणी पाच जणांना अटक करून त्यांच्याजवळून 10 लाख 72 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. मारिहाळ पोलिसांनी फिंगरप्रिंटवरून चोरी प्रकरणाचा छडा लावला आहे.
बाळेकुंद्री खुर्द, पंतनगर, गोकुळनगर व हिरेबागेवाडी परिसरात झालेल्या घरफोडय़ांप्रकरणी एका जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळून 5 लाख 12 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 114 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
माळमारुती पोलिसांनी तिघा जणांच्या एका टोळीला अटक करून 5 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, दोन मोटारसायकली, टीव्ही असा ऐवज जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
शहर व उपनगरांमध्ये चोऱया-घरफोडय़ांचे प्रकार वाढले आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले होते. फिंगरप्रिंटवरून चोरी प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेण्यात मारिहाळ पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.