पुलाची शिरोली / प्रतिनिधी
येथील सुकन्या व सातारा येथे कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक कु. प्रियांका मारुती उर्फ पप्पू संकपाळ यांनी कोल्हापूरच्या नावलौकिकात भर टाकली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो दिल्ली येथे घेण्यात आलेल्या ऑल इंडिया बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फॉर फिंगर प्रिंट एक्स्पर्ट या परिक्षेत त्यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.
प्रियांका संकपाळ ह्या पुलाची शिरोली, ता. हातकणंगले इथल्या रहीवाशी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरोलीत तर माध्यमिक शिक्षण डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, कोल्हापूर येथे पूर्ण झाले आहे. तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठातून बॅचलर इन जर्नालिझम मास कम्युनिकेशन हा कोर्स पूर्ण केला आहे.
प्रियांका संकपाळ यांच्या वडिलांचे लहानपणीच अपघातात निधन झाले आहे. त्यामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई दुर्गा संकपाळ यांनी आपल्या खांद्यावर घेऊन यशस्वी पार पाडली. प्रियांका या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत त्यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न २१ नोव्हेंबर २०१९ रोजी पूर्ण केले. पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड होताच त्यांची सातारा पोलिस दलात फिंगर प्रिंट विभागात नेमणूक झाली. या पदावर काम करत असतानाच त्यांनी ऑल इंडिया बोर्ड ऑफ एक्झामिनेशन फोर फिंगरप्रिंट एक्सपर्ट ही परीक्षा दिली. इंग्रजीचे ज्ञान कमी असतानाही या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या परीक्षेत देशातील विविध राज्यातून ७६ फिंगरप्रिंट अधिकारी उपस्थित होते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व मुलाखत अशा तीन प्रकारे घेण्यात आली. या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षक प्रियांका संकपाळ यांनी २५० पैकी २२४ गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. प्रियांका संकपाळ या पुरस्कार मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. त्यांनी फिंगरप्रिंट विभागात मानाची समजली जाणारी अजिज उल हक ट्रॉफी यांनी वीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये आणली. याबद्दल त्यांची पोलिस दलाकडून तसेच शिरोली येथील नागरिकांच्या कडून अभिनंदन होत आहे.