जिल्हा रुग्णालयातील प्रकार : सिव्हिल सर्जनांनी दखल घेतल्याने तातडीने झाले काम
प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोना स्थितीमुळे सर्वजण तसे हैराण आहेत. अशातच सातारा जिल्हा रुग्णालयात कोरोना विरुध्दची लढाई लढली जात असतानाच सर्टिफिकेटसाठी अडवणूक थांबलेली नाही. जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱयालाच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱयांनी फिटनेस दाखल्यावर सही करण्यास टाळाटाळ करण्याचा प्रकार घडला. मात्र, हा प्रकार समजल्यावर खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी त्या पोलीस कर्मचाऱयाच्या दाखल्यावर सही करत तातडीने काम केले.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस कर्मचारी आठ दिवसापूर्वी अपघातात जखमी झाला होता. पायाला जखम झाल्यामुळे त्यांनी आठ दिवसाची रजा काढली होती. पायाची जखम बरी झाल्यामुळे त्यांना ऍडव्हान्स सर्टिफिकेटची गरज होती. पहिल्या 4 दिवसाचे सर्टिफिकीट त्यांना मिळाले होते. मात्र आणखी 4 दिवसांचे सर्टिफिकीट त्यांना हवे होते. मात्र ते देण्यास जिल्हा रुग्णालयातील एक वैद्यकीय अधिकारी विविध कारणे सांगून टाळाटाळ करू लागला. संबंधित पोलिसाला शुक्रवार दि. 6 नोव्हेंबर रोजीच्या फिटनेस सर्टिफिकेटवर स्वाक्षरी हवी होती. मात्र ती स्वाक्षरी करण्यासाठी त्या वैद्यकीय अधिकाऱयाने नकार दिला. सातारा जिल्हा पोलिस दलाबद्दल प्रत्येकाच्या मनात एक नितांत आदर आहे. जनतेला पोलिसांना नेहमीच आपला मित्र समजतात. मात्र, पोलिसाच्या फिटनेस सर्टिफिकेटवर स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱया संबंधित वैद्यकीय अधिकाऱयाचे डोके ठिकाणावर आहे की नाही हेच तपासण्याची वेळ आली आहे.