विद्युत सहाय्यकपदी नेमणूक झालेल्या उमेदवारांचा राडा
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा शासकीय रूग्णालयात महावितरण कंपनीद्वारा विद्युत सहाय्यक पदी नेमणूक झालेल्या परजिह्यातील उमेदवारांनी शुक्रवारी सकाळी गोंधळ घातला. 80 पेक्षा अधिक उमेदवारांनी एकत्र येवून जिल्हा रूग्णालयाच्या प्रशासनावर दबाव टाकत वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घोषणाबाजी केली. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणताही पत्रव्यवहार न करता संबंधित उमेदवारांनी जिल्हा रूग्णालयात व्हिडिओ शूटिंग, मोबाईलवर फोटो काढण्याचे प्रकार केले. या प्रकारची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला उपस्थित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी जिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली. तोपर्यंत उमेदवारांनी तेथून काढता पाय घेतला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत सहाय्यक योजनेअंतर्गत भरतीद्वारे काही उमेदवारांची विद्युत सहाय्यकपदी नेमणुकीसाठी निवड केली होती. यामध्ये विशेष करून उस्मानाबाद, परभणी, जळगाव आदी जिह्यातील उमेदवारांची संख्या 80 पेक्षा अधिक आहे. त्यांना नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्यांच्या कंपनीतील सेवेसाठी त्यांच्या शारीरिकदृष्टय़ा पात्र असल्याबाबतचे वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र देणे त्यांना अनिर्वाय करण्यात आले होते.
हे प्रमाणपत्र देण्यासाठी विविध जिह्यातून पात्र उमेदवार शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अचानक घोळक्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मुळात याबाबतची कोणतीही पूर्वकल्पना जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण अथवा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली नव्हती.
जिल्हा रुग्णालयात नियमित कामकाज सुरू असताना या विद्युत सहाय्यकपदी नेमणूक झालेल्या उमेदवारांनी जिल्हा रुग्णालयात प्रवेश करत वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र तत्काळ देण्यात यावेत अशी मागणी केली. परंतु जिल्हा रुग्णालयात प्रत्येक दिवशी आठ ते दहा एवढय़ा जणांची वैद्यकीय तपासणी केली जाते. जिल्हा रुग्णालयात अपुरे मनुष्यबळ आहे. यामुळे अधिक जणांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. ही वस्तुस्थिती असताना उमेदवारांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घालत भारत माता की जय, अशी घोषणाबाजी केली. आम्हाला वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र दिलेच पाहिजे, असा दबाव आणत जिल्हा रुग्णालयात एकच गदारोळ केला.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीत तैनात असणारे पोलीस नाईक कृष्णदेव शेडगे, सुरक्षारक्षक राजू कांबळे, शिवाजी इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्र हाती मिळताच संबंधित उमेदवारांनी अक्षरशः हुल्लडबाजी करत जिल्हा रुग्णालयातून पलायन केले.
डॉ. चव्हाणांनी व्यक्त केली नाराजी
याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना मिळताच त्यांनी प्रथम घडलेल्या घटनेची माहिती घेऊन महावितरण कंपनीच्या अधिकाऱयांशी संपर्क साधत जिल्हा रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती देत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. जिल्हा रुग्णालय प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चिकित्सा प्रमाणपत्रासाठी तुम्ही पाठवताच कसे, असा जाब विचारला. दरम्यान, वीज वितरण कंपनीशी संबंधित असणारे साताऱयातील काही कंत्राटी नेते जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी डॉ. सुभाष चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र डॉ. चव्हाण यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण पोलीस तक्रार करणार असल्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांनी संबंधित उमेदवारांना आपल्यापुढे उभे करून त्यांना माफी मागायला लावतो, असे सांगत पलायन केले. दरम्यान, डॉ. चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. निंबाळकर यांनी एपीआय मोरे यांच्या समवेत तत्काळ एक पोलीस पथक जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. पथकासमवेत मोरे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल होत संपूर्ण घटनाक्रमाची माहिती घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनाबाहेर कायम दोन पोलीस तैनात करण्याचा निर्णय झाला. तसेच यापुढे कोणी वावगे वागल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही अशा शब्दात डॉ. सुभाष चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.