शुभम राऊत/ रत्नागिरी
’फिट इंडिया’ मोहिमेत रत्नागिरी जिह्याने चौथा क्रमांक पटकावला आहे. सुमारे एकूण 3600 शाळा-कॉलेजांपैकी 2612 शाळा-कॉलेजांनी नोंदणी करून फिट इंडिया मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला. या मोहिमेला मुदतवाढ मिळाल्यामुळे तब्बल 81.25 टक्के नोंदणी आतापर्यंत झाली आहे. मुदतीबाबत अजूनही कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे अजून प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.
‘फिट इंडिया’च्या नोंदणीत ’मुंबई उपनगर’ पहिल्या तर दुसऱया क्रमांकावर ’गोंदिया’ तसेच ’परभणी’ने तिसरा क्रमांक पटकावला आहे. 10 जानेवारीपर्यंत मुदत असलेल्या या मोहिमेची मुदत आता अजून वाढवण्यात आली आहे. कोरोना काळात सर्वांच्याच शारीरिक क्षमतेचा कस लागला. प्रतिकार क्षमतेअभावी अनेकांचा कोरोनाने बळी घेतला. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ’फिट इंडिया’ मोहीम सुरू केली. जिह्यातून या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सुमारे 3600 शाळांपैकी 2612 शाळांनी सहभाग नोंदवला. खेळांकडे पाहण्याचा समाजाचा आणि शाळांचा दृष्टीकोन यावरून स्पष्ट होत आहे. जिल्हय़ात पहिली ते बारावीच्या 3600 शाळा आहेत. सर्वच शाळांनी ’फिट इंडिया’मध्ये सहभाग घेणे अपेक्षित आहे. फेब्रुवारीत मोहीम सुरू झाल्यानंतर क्रीडा व शिक्षण विभागाने तालुकानिहाय बैठका घेतल्या.
या योजनेची माहिती देऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले. तालुक्यातील शाळांनी मात्र नोंदणीकडे पाठ फिरवली. नोंदणीची मुदत 27 डिसेंबरपर्यंतच होती. परंतु तोपर्यंत प्रतिसाद कमी मिळाल्याने ती मुदत 10 जानेवारीपर्यंत करण्यात आली. नोंदणी करणाऱया शाळांनाच याचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण नोंदणी ऑनलाईन स्वरूपात करायची आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला लिंक देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात नोंदणी सुरू झाली. नेमक्या याच काळात शाळा बंद होत्या. विद्यार्थी व क्रीडा शिक्षकांचा संपर्कच राहिला नाही. त्याचाही फटका फिट इंडिया’ला बसला. मुळात या उपक्रमाची सुरुवातच चुकीच्या वेळी झाल्याची प्रतिक्रिया क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केली. कोरोना काळात शाळा बंद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज ढेपाळले. त्यामुळेच फिट इंडिया अंतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्णपणे झाली नाही. किंबहुना विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहतील काय, अशी भीती व्यक्त होत होती. शाळांमध्ये खेळांविषयी अत्यंत आस्था असल्याचे ’फिट इंडिया’ मोहिमेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.